प्रयोगशाळेत ब्लॅकहोल बॉम्बची निर्मिती
ब्रह्मांडात अनेक रहस्यं दडलेली आहेत, आजही वैज्ञानिक या रहस्यांची उकल करू पाहत आहेत. यात ब्लॅकहोलवरून आजही नवनव्या रहस्यांची जाणीव होत आहे. ब्लॅकहोलमध्ये मोठ्या प्रमाणात गुरुत्वाकर्षण असते, याच्या जवळ येणारी कुठलीही गोष्ट वाचू शकत नाही.
येथे येणारी प्रत्येक गोष्ट त्याच्यात सामावून जाते. वैज्ञानिकांनी अलिकडेच ब्लॅक होल बॉम्ब तयार केला आहे. वैज्ञानिकांनी पहिल्यांदाच प्रयोगशाळेत ब्लॅकहोलला जिवंत करून दाखविले आहे. ब्लॅकहोल बॉम्ब हा प्रत्यक्षात खरा बॉम्ब नसून ही एक थेअरी आहे, जी प्रसिद्ध वैज्ञानिक रोजर पेनराज आणि याकोव जेल्दोविच यासारख्या वैज्ञानिकांकडून 1970 च्या दशकात मांडण्यात आली होती.
ब्लॅकहोल केवळ गोष्टी गिळकृंत करत नाही तर स्वत:च्या हालचालींद्वारे गोष्टींची ऊर्जाही वाढवितो. या प्रक्रियेला योग्यप्रकारे केले तर एक पॉझिटिव्ह फीडबॅक लूप निर्माण होईल आणि ऊर्जा निर्माण होईल आणि तेथे असलेल्या सर्व गोष्टी आपोआप नष्ट होतील, यालाच ब्लॅकहोल बॉम्ब म्हटले जाते.
ब्लॅकहोलशी निगडित कुठल्याही गोष्टीचे ब्लॅकहोलच्या नजीक जाऊन परीक्षण करता येत नाही. याचमुळे वैज्ञानिकांनी या थेअरीला लॅबमध्ये टेस्ट केले आहे. या प्रकरणात मॅग्नेटिक फील्डमध्ये फिरत्या सिलेंडरद्वारे याचे परीक्षण करण्यात आले. वैज्ञानिकांनी अद्याप या तंत्रज्ञानाचे केवळ परीक्षण केले आहे. सध्या या तंत्रज्ञानाला शस्त्रास्त्रांशी जोडून पाहिले जाऊ शकत नाही. या संशोधनाद्वारे ब्लॅकहोलविषयी आणखी माहिती प्राप्त करता येणार आहे.