सरकारच्या योजनांबाबत घरोघरी जागृती करा!
राज्य युवा काँग्रेसचे मुख्य सचिव राहुल जारकीहोळी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
बेळगाव : राज्य सरकारने सर्व समुदायातील गरीब आणि शोषितांच्या उद्धारासाठी अनेक कार्यक्रम राबविले आहेत. गॅरंटी योजनांसह अनेक योजना जारी करून त्या यशस्वी केल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी घरोघरी भेट देऊन सरकारच्या कामगिरीबद्दल जनतेत जागृती निर्माण करावी. जिल्ह्यांच्या नूतन पक्षाध्यक्षांनी आपल्या जिल्ह्यांमध्ये तळागाळातून पक्षसंघटना करण्यासाठी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन कर्नाटक युवा प्रदेश काँग्रेसचे मुख्य सचिव राहुल जारकीहोळी यांनी केले. येथील जिल्हा काँग्रेस भवनमध्ये सोमवारी आयोजित बेळगाव शहर युवा काँग्रेस कार्यकारिणीच्या सभेत कार्यकर्त्यांना उद्देशून ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी राज्य युवा काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष व राज्य पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. ते म्हणाले, येणारी आव्हाने आणि संघटनात्मक उपक्रमांविषयी यापूर्वीच विस्तृतपणे चर्चा झाली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक सल्ले व सूचना दिल्या आहेत.
ग्रा. पं. निवडणुकीपासून ते सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी बूथ स्तरापासून जिल्हा पथकांनी कोणत्या रितीने कामे करावीत, याबाबत सल्ले देण्यात आले आहेत. राज्यातील काँग्रेस सरकारच्या मागील दोन्ही कार्यकाळात अनेक योजना जारी झाल्या आहेत. परंतु, योजनांचा प्रचाराचा पक्षात अभाव आहे. त्यामुळे सरकारच्या योजनांबाबत कार्यकर्त्यांनी माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. मतदारसंघांतील जनतेच्या मनात सरकारची कामे कितपत खोलवर रुजतील तितकी मते काँग्रेसला मिळतील. केंद्रातील भाजप सरकारच्या अपयशाची जाणीव लोकांना करून दिली पाहिजे. राज्य सरकारच्या कामगिरीची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आणखी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.
दुचाकी रॅली
सभेपूर्वी बेळगाव जिल्हा युवा काँग्रेसतर्फे चन्नम्मा सर्कलपासून जिल्हा काँग्रेस कार्यालयापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. याप्रसंगी बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, राज्य युवा काँग्रेस अध्यक्ष मंजुनाथ गौडा, उपाध्यक्ष दिपिका रेड्डी, जिल्हा मुख्य सचिव प्रदीप एम. जे., जिल्हाध्यक्षा सागर दिवटगी, चिकोडी जिल्हाध्यक्ष सिद्दीक अंकलगी आदी उपस्थित होते.