नव्या सरकारचा 100 दिवसांचा रोडमॅप तयार करा!
पंतप्रधान मोदींकडून मंत्र्यांना निर्देश : पुढील 5 वर्षांसाठी रुपरेषा तयार करावी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:च्या कॅबिनेटच्या मंत्र्यांना आगामी निवडणूक पाहता नवे सरकार स्थापन होण्यापूर्वी 100 दिवसांचा रोडमॅप आणि पुढील 5 वर्षांसाठी एक रुपरेषा तयार करण्यास सांगितले आहे. पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षत्व करत मंत्र्यांना स्वत:च्या विभागांचे सचिव तसेच अन्य अधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा करण्याची सूचना केली आहे. नव्या सरकारचे पहिले 100 दिवस आणि पुढील 5 वर्षांच्या अजेंड्याला प्रभावीपणे कशाप्रकारे लागू केले जाऊ शकते याचा आराखडा या मंत्र्यांना सादर करावा लागणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाची ही बैठक निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्याच्या दुसऱ्या दिवशी झाली आहे. मंत्रिमंडळाने निवडणूक आयोगाची शिफारस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवून 7 टप्प्यातील लोकसभा निवडणुकांच्या तारखांना अधिसूचित करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत 19 एप्रिल रोजी 102 मतदारसंघांमध्ये मतदानासाठी पहिली अधिसूचना 20 मार्च रोजी जारी केली जाणार आहे. अधिसूचना जारी होताच त्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होते.
यापूर्वी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने 3 मार्च रोजी ‘विकसित भारत : 2047’साठी व्हिजन डॉक्यूमेंट आणि पुढील 5 वर्षांसाठी एक विस्तृत कार्ययोजनेवर विचारमंथन केले होते. जून महिन्यात नवे सरकार स्थापन झाल्यावर उचलण्यात येणाऱ्या तत्काळ पावलांच्या अंतर्गत 100 दिवसांच्या अजेंड्यावर विचारविनिमय करण्यात आला आहे. विकसित भारताचा हा रोडमॅप 2 वर्षांहून अधिक कालावधीतील सखोल तयारीचा परिणाम होता आणि याकरता सर्व मंत्रालये, राज्य सरकार, शिक्षणतज्ञ, उद्योगसंस्थांसोबत व्यापक सल्लामसलत करण्यात आली होती. तसेच 20 लाखाहून अधिक जणांकडून सूचना प्राप्त झाल्या होत्या