निसर्गाचे तडाखे तर पोटनिवडणुकीचे आडाखे
एकीकडे कर्नाटकात निसर्गाचे रौद्ररुप बेफाम पावसाच्या रुपाने पाहायला मिळाले असून याने अनेक ठिकाणी महत्त्वाच्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. परतीच्या पावसाने उत्तर आणि दक्षिण कर्नाटकात पिकांचे नुकसान केले आहे. दुसरीकडे राज्यात तीन जागांवर पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्षनेते तयारीला लागले आहेत.
कर्नाटकात परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे भात, मका, कांदा, तूर, हरभरा, कुळीथ, उडीद, मूग, मटकी, भुईमूग, कापूस, मोहरी, सोयाबीन, करडी आदी पिकांबरोबरच तेलबियाणे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदा 70 लाख हेक्टरमध्ये पेरणी झाली होती. यापैकी निम्मे पीकही येईल की नाही, अशी शंका आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. आणखी दोन दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कायम असणार, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. भातपिकाचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे यंदा धान्याचे दर वाढणार, अशी शक्यता आहे. उत्तर आणि दक्षिण कर्नाटकात पावसाचा जोर आहे. खासकरून बेळगाव परिसरात भातपिकाचे नुकसान झाले आहे. बासमती भाताला देशविदेशात बेळगावचा नावलौकिक आहे. यंदा भातपिकाचे नुकसान झाले आहे. शेतवडीत पावसाचे पाणी साचल्यामुळे हाती आलेले पीक वाया गेले आहे. काही जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे कीटबाधा वाढण्याची शक्यता वाढली आहे.
शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. तशातच चन्नपट्टण, शिग्गाव व संडूर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 13 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या तिन्ही जागांवर हक्क मिळविण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजप-निजद युतीमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे चन्नपट्टणच्या आमदारकीला कुमारस्वामी, शिग्गावला बसवराज बोम्माई व संडूरला तुकाराम यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. चन्नपट्टणमधील सत्तासंघर्ष टिपेला पोहोचला आहे. कोणत्याही परिस्थितीत कुमारस्वामी यांची पकड ढिली करून काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी तर जणू चंगच बांधला आहे. त्यामुळेच चन्नपट्टणमध्ये आपणच उमेदवार असे ते जाहीरपणे सांगत आहेत.
माजी मंत्री सी. पी. योगेश्वर यांना भाजप-निजद युतीची उमेदवारी मिळण्याची आशा आहे. मात्र, या मतदारसंघात आपला चिरंजीव निखिल कुमारस्वामी यांना उमेदवारी देण्याचा विचार एच. डी. कुमारस्वामी यांनी सुरू केला आहे. चन्नपट्टणमधून युतीचा उमेदवार कोण असणार? याची उत्कंठा वाढली आहे. जर सी. पी. योगेश्वर यांना उमेदवारी मिळाली नाही तर अखेरच्या क्षणी ते काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे. खरेतर चन्नपट्टणमधून चित्रपट अभिनेते दर्शन तुगुदीप यांना उमेदवारी देण्याचा विचार उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी चालविला होता. मात्र, चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी खून प्रकरणात गेल्या तीन महिन्यांपासून ते कारागृहात आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणी आपले बंधू माजी खासदार डी. के. सुरेश किंवा पुट्टण्णा यांना उमेदवारी देण्याचा विचार शिवकुमार यांनी चालविला आहे. शिग्गाव व संडूरच्या उमेदवारीसाठी चढाओढ सुरू आहे. शिग्गावमधून आपला चिरंजीव भरतला उमेदवारी मिळविण्यासाठी माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार बसवराज बोम्माई यांनी चाचपणी सुरू केली आहे. पोटनिवडणूक प्रचारातही मुडा भूखंड घोटाळा व सर्वपक्षीयांची वेगवेगळी भ्रष्टाचार प्रकरणे प्रचाराचे मुद्दे असणार आहेत.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील मुडा भूखंड घोटाळ्याचा उल्लेख करीत जाहीर सभातून काँग्रेसविरुद्ध टीकेची झोड उठविली होती. कर्नाटकातील प्रकरणे इतर राज्यात निवडणूक प्रचाराचे मुद्दे बनले होते. सध्या महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रातही हरियाणाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी काँग्रेसने काळजी घेतली आहे. एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. पोटनिवडणुकीत तिन्ही जागा जिंकून विरोधकांना जशास तसे उत्तर देण्याची सूचना काँग्रेस हायकमांडने दिली आहे. उमेदवारी निवडीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोडदौड रोखण्यासाठी कर्नाटकातील नेत्यांनीही प्रचाराची आघाडी सांभाळण्याचे ठरवण्यात आले आहे. कारण महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात कर्नाटकातील राजकीय नेत्यांची पकड आहे. त्यामुळे के. सी. वेणुगोपाल यांनी कर्नाटकी नेत्यांची मदत मागितली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नीने चौदा भूखंड मुडाला परत केल्यामुळे या प्रकरणाचा जोर कमी झाला आहे. मुडा भूखंड घोटाळ्यात भविष्यात सिद्धरामय्या यांच्या अडचणी वाढल्याच तर पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील ते सगळ्यांना मान्य करावेच लागतील, असा संदेश काँग्रेस हायकमांडने कर्नाटकी नेत्यांना दिला आहे. मुख्यमंत्र्यांचे आसन सध्या तरी सुरक्षित आहे. महाराष्ट्राच्या निवडणुका होईपर्यंत तरी त्यांना धक्का लागणार नाही. जर मुख्यमंत्री बदलाचा प्रश्न उद्भवला तर सतीश जारकीहोळी यांचे नाव प्रामुख्याने पुढे करण्यात येत आहे.
सतीश जारकीहोळी हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या तालमीत तयार झालेले नेते आहेत. सामाजिक समानतेसाठी बुद्ध, बसव, आंबेडकर विचार मंचच्या माध्यमातून सामाजिक बदलासाठी सातत्याने झटतानाच शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक विकासासाठी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून ते सतत कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा वाढली आहे. आमदार मुनीरत्न यांना लैंगिक अत्याचार प्रकरणात जामीन मिळाला आहे. महर्षी वाल्मिकी निगममधील भ्रष्टाचार प्रकरणात आमदार बी. नागेंद्र यांचीही जामिनावर मुक्तता झाली आहे.मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे नाव घेण्यासाठी तपास यंत्रणांकडून आपल्यावर दबाव घालण्यात आला, अशी माहिती नागेंद्र यांनी दिली आहे. नागेंद्र व मुनीरत्न यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे थाटात स्वागत केले आहे. नागेंद्र यांनी तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेटही घेतली आहे. तीन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी कर्नाटकातील राजकीय वातावरण पुन्हा तापते आहे.