काकती-होनगा मार्गावरील ब्रिटिशकालीन पुलाला तडे
पूल कोसळून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता : राष्ट्रीय महामार्ग विभागाने दखल घ्यावी : पालकमंत्र्यांनी अधिवेशनात प्रस्ताव मांडण्याची मागणी
वार्ताहर/काकती
काकती-होनगा मार्कंडेय नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाच्या बांधकामाला तडे गेले असून पूल कोसळून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. याची दखल राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेण्याची मागणी होत आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी नवा पूल बांधण्यासाठी या हिवाळी अधिवेशनात प्रस्ताव मांडून तातडीने पूल बांधण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याच्या प्रयत्नात नागरिक आहेत. गेल्या पावसाळ्यात संततधार पाऊस झाल्याने या ब्रिटिशकालीन पुलाच्या दगडी बांधकामाला तडे गेले आहेत. याची माहिती संबंधित राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना देताच कोणताही अनर्थ घडू नये, याकरिता राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. या वाहतुकीतील अडथळ्यामुळे वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. संबंधीत अधिकारी व पालकमंत्र्यांनी या पुलाची पाहणी करून अधिवेशनाच्या बैठकीत ठराव मंजूर करून नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. अन्यथा काकती, होनगा येथील ग्रामस्थ आंदोलन छेडणार आहेत.
सर्व्हिस रोडचे रुंदीकरण आवश्यक
या राष्ट्रीय महामार्गासह काकती-होनगा सर्व्हिस रस्ता व होनगा औद्योगिक वसाहतीला सर्कलमधील जोडणारा रस्ता असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. या सर्व्हिस रस्त्यावरील जुने धोकादायक पूल काढून नवीन पूल बांधणे गरजेचे आहे. तसेच काकती येथील दोन्ही बाजुचे सर्व्हिस रोडचे विस्तारीकरण करणे आवश्यक आहे. सर्व्हिस रस्त्याचे विस्तारीकरण झाले नसल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
- वर्षा मुचंडीकर, ग्रा.पं.अध्यक्षा
...अन्यथा आंदोलन छेडू!
औद्योगिक वसाहतीला मालवाहतुकीची ने-आण करावी लागते. जुना पूल बंद झाला असल्याने मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्यावेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन पूल बांधण्यासाठी या बेळगावच्या अधिवेशनात ठराव मंजूर करावे, अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यास मागेपुढे पाहणार नाही.
- किरण पाटील