कानात ‘खेकडा’
सध्या सोशल मिडियावर एक अनोखी घटना प्रसारित होत आहे. एक महिला आपल्या 9 वर्षांच्या मुलासह समुद्रतटावर सहलीला जाते. तेथे तिचा मुलगा समुद्रात पोहतो. बुचकळ्या घेतो. त्यानंतर तो बाहेर येतो. काही वेळाने त्याच्या कानात दुखू लागते. त्यामुळे त्याच्या आईने त्याला त्वरित पुन्हा हॉटेलात आणले. पण नंतर मुलाची प्रकृती अधिकच बिघडली. त्यामुळे त्याला डॉक्टरकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी कानाची तपासणी केली तेव्हा कानाच्या नलिकेत एक छोटा खेकडा घुसल्याचे आणि तो हालचाल करीत असल्याचे त्यांना दिसून आले. मुलगा तोवेळपर्यंत वेदनेने बेशुद्ध होण्याच्या परिस्थितीत आला होता.
हा जीवघेणा प्रसंग होता. डॉक्टरांनी तातडीने एक छोटी शस्त्रक्रिया करुन खेकड्याला बाहेर काढले. बाहेर काढताना तो खेकडा जिवंतच होता. तो जर या मुलाच्या कानाच्या अधिक आतल्या आणि नाजूक भागात शिरला असता आणि तेथे त्याने चावा घेतला असता, तर मुलाचा जीव धोक्यात आला असता. मात्र, त्याच्या आईने त्याला त्वरित डॉक्टरांकडे नेल्याने त्याचा जीव वाचला. ही घटना मेक्सिको या देशाच्या कॅनकुन या निसर्गरम्य स्थानी घडली आहे. हे स्थान पांढरी शुभ्र वाळू आणि बिचकरीता प्रसिद्ध आहे. येथे नेहमी पर्यटकांची वर्दळ असते. या मुलाच्या मातेचे नाव किटजिया असे असून मुलाचे नाव पेड्रो असे आहे. या मातेने स्वत:च या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रसारित केला आहे. त्यामुळे ही घटना जगाला कळली. समुद्र, नदी ंकिंवा पर्वत अशा स्थानी मुलांना सहलीसाठी नेताना त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवावे लागते. विशेषत: नैसर्गिक जलस्रोसांमध्ये मुले किंवा मोठी माणसेही पोहायला उतरणार असतील, तर त्यांनी आपले कान झाकून घेणारी साधने उपयोगात आणायची असतात. पाण्यात शिरताना सुरक्षिततेचे शक्य ते सर्व उपाय करणे आवश्यकच असते असे नाही, तर ते अनिवार्य असते, हा धडा सर्वांना या घटनेने दिला आहे. या घटनेत सुदैवाने मुलाचा जीव वाचला. तथापि, सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड करता कामा नये, हे निश्चित आहे. कोठेही असे प्रसंग घडलेले असले तरी त्यांची माहिती याच कारणाकरिता करुन घ्यायची असते, हे या प्रसंगाने योग्य रितीने साऱ्यांना दाखवून दिले आहे.