एचएमपीव्ही प्रतिबंधासाठी ‘सीपीआर’ प्रशासन सज्ज
कोल्हापूर :
चीनमध्ये झपाट्याने वाढत असलेल्या ह्यूमन मेटापन्यूमो व्हायरसने (एचएमपीव्ही) देशासह आता राज्यातही संसर्ग आढळला आहे. हा आजार श्वसनाशी निगडित असून सामान्य सर्दीसारखा आहे. नागरिकांनी घाबरून न जाता शासनाच्या सुचनांचे पालन करावे. हा आजार सामान्य असला तरी सीपीआर प्रशासन सज्ज असल्याची माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. अनिता सैबन्नावर यांनी दिली.
एचएमपीव्ही बाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता भारतात संसर्ग दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, हा नवीन व्हायरस नसून जूना व्हायरस आहे. यापूर्वीही एचएमपीव्ही विषाणूंचा संसर्ग झाला होता. त्यामुळे याचा धोका कमी आहे. लहान मुले व वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी, असेही डॉ. सैबन्नावर यांनी सांगितले. दमा, अस्थमा आदी श्वसनाशी निगडित आजारातील रूग्णांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
सकस आहार घ्या
हिवाळ्यात सर्दी, ताप, खोकला व घशाच्या आजारात वाढ होते. एचएमपीव्ही हा संसर्ग सामान्य सर्दीसारखाच आहे. सर्दी, खोकला रोखण्यासाठी किंवा याचा संसर्ग होऊ नये, यासाठी सकस आहाराचा समावेश आवश्यक आहे. एचआयव्ही, क्षयरोग, दमा आदी आजार असणाऱ्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे या काळात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जात आहे.
वृद्ध व लहान मुलांना सांभाळा
या विषाणूचा संसर्ग सर्वच वयोगटातील नागरिकांना होऊ शकतो. मात्र, प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना याच्या संसर्गाची शक्यता अधिक बळावते. लहान मुले व वृद्धांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. वृद्ध व लहान मुलांना कोणतेही लक्षणे दिसताच अंगावर न काढता डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत.
बाहेर पडताना मास्क वापरा
सध्या थंडीचा जोर वाढला आहे. धुलीकणासह शहरात धुळ उडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सर्दी, खोकला व घशाचे रूग्ण वाढत आहेत. एचएमपीव्ही संसर्गाचा धोका हिवाळ्यात अधिक असतो. हिवाळ्यात याचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापराच, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
प्रतिबंध आवश्यक
एचएमपीव्ही संसर्ग रोखण्यासाठी कोरोना काळात जी काळजी घेतली तीच काळाजी घ्यायची आहे. प्रतिबंध करण्यासाठी सॅनिटायजर वापरणे, बाहेरूण आल्यानंतर हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, बोलताना सुरक्षित अंतर ठेवणे, लक्षणे आढळताच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेणे, विश्रांती घेणे, सर्दी झाल्यास मास्क वापरणे आदी सुचनांच्या पालनाने प्रतिबंध करता येऊ शकते.