माकप महासचिवपदी एम.ए. बेबी
सीताराम येच्युरींच्या निधनानंतर रिक्त होते पद : पक्षाची मदुराई येथे पार पडली बैठक
वृत्तसंस्था/ मदुराई
केरळचे माजी मंत्री एम.ए. बेबी यांना माकपचे नवे महासचिव म्हणून रविवारी नियुक्त करण्यात आले आहे. माकपच्या 24 व्या पक्ष काँग्रेस बैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात आला. सीताराम येच्युरी यांच्या निधनानंतर माकपमध्ये महासचिव पद रिक्त झाले होते. माकपची बैठक रविवारी तामिळनाडूच्या मदुराईमध्ये आयोजित करण्यात आली. याच बैठकीत पक्षाचे पुढील महासचिव म्हणून एम.ए. बेबी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
70 वर्षीय एम.ए. बेबी (मरियम एलेक्झेंडर बेबी) यांनी माकपची विद्यार्थी संघटना स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून सक्रीय राजकारणाची सुरुवात केली होती. यानंतर बेबी हे पक्षाची युवा शाखा डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाशी जोडले गेले. तर 1986-98 पर्यंत माकपच्या वतीने ते राज्यसभा सदस्य म्हणून कार्यरत होते.
माकप महासचिव पदाच्या शर्यतीत एम.ए. बेबी यांच्यासोबत ऑल इंडिया किसान सभेचे अध्यक्ष अशोक धवाले यांचेही नाव चर्चेत होते. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात सीताराम येच्युरी यांच्या निधनानंतर माकप महासचिव पद रिक्त होते. आतापर्यंत प्रकाश करात हे अंतरिम पक्ष महासचिव पदाची जबाबदारी सांभाळत होते.
माकपचे महासचिव होणारे एम.ए. बेबी हे केरळचे दुसरे नेते ठरले आहेत. यापूर्वी ई.एम. नंबुद्रीपाद यांनी ही जबाबदारी सांभाळली होती. पॉलिट ब्युरोच्या 16 सदस्यांपैकी 11 सदस्यांनी बेबी यांच्या नावाला समर्थन दर्शविले. एम.ए. बेबी हे केरळच्या कोल्लम जिल्ह्याच्या प्रक्कुलम भागाचे रहिवासी आहेत. बेबी हे केरळ माकपमध्ये मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यानंतरचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत.
पक्ष पॉलिट ब्युरोच्या 5 सदस्यांनी बेबी यांच्या पदोन्नतीला विरोध दर्शविला. यात पश्चिम बंगालमधील नेते सूर्यकांत मिश्रा, नीलोत्पल बसू, मोहम्मद सलीम आणि रामचंद्र डोम यांच्यासोबत महाराष्ट्रातील पक्षाचे नेते अशोक धावले यांचा समावेश आहे. अंतर्गत असंतोषानंतरही प्रकाश करात यांनी महासचिव पदासाठी केवळ बेबी यांना समर्थन दिले.