कव्हर ड्राईव्ह : कसोटी क्रिकेटकडे ‘गंभीर’तेने बघा
भारतीय क्रिकेट संघाचे नेमकं चाललंय काय? हा मला एकट्याला भेडसावणारा प्रश्न नाही आहे. हा भारतीय क्रिकेटसाठी पडलेला मिलियन डॉलर प्रश्न आहे. न्यूझीलंडने मागच्या दिवाळीत व्हाईटवॉश देत भारतात दिवाळी साजरी केली. आनंदाने फटाके वाजवले. फटाक्यात लवंगीची माळ नव्हती तर चक्क अॅटम बॉम्ब होते. 2012 मध्ये मायदेशात इंग्लंडने आपल्याला चितपट केलं होतं. परंतु हे क्रिकेट आहे कधीतरी असं घडणारच, असं मानून आपण आपल्या मनाची समजूत काढली. परंतु पुन्हा 365 दिवसात त्याचीच पुनरावृत्ती. किंबहुना पुन्हा आपण त्याच वळणावर येऊन अडकलोय. मागील एक वर्षात ज्या पद्धतीने कसोटी क्रिकेटचा बुरुज कोसळतोय हे पाहणं आता क्लेशदायक ठरत आहे.
तुम्ही परदेशात हिरव्यागार खेळपट्टीवर ‘ढेर’ होत असाल तर आपण समजू शकतो. परंतु आपण आपल्याच ट्रॅकमध्ये अडकतोय आणि आपल्याच आखाड्यात चितपट होतोय, हे निश्चित माझ्यासारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्लेषकाला वेदनादायी. एका वर्षात दोन वेळा व्हाईटवॉश बघण्याइतपत भारताला कसोटी क्रिकेटमध्ये वाईट दिवस आलेत का? असो. आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यातील भारताची कामगिरी बघून मला ‘दीवार’ चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्यातील तो पुलाखालील संवाद आठवला. शशी कपूर अमिताभला म्हणतो की तुझ्याकडे पैसा, जमीन, बँक बॅलन्स सर्वकाही आहे. परंतु माझ्याकडे ‘आई’ आहे. बावुमा भारतीय संघाला उद्देशून हेच म्हणत असेल की तुमच्याकडे वनडे विश्वचषक, टी-20 विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. परंतु क्रिकेटची आई अर्थात कसोटी क्रिकेटची गदा आमच्याकडे आहे. सफेद चेंडूवर तुम्ही कितीही दादागिरी दाखवली तरी कसोटी क्रिकेट हेच खरंखुरं क्रिकेट आहे, हे विसरून चालता येणार नाही. लाल चेंडू हाच क्रिकेटचा आत्मा आहे. परंतु हे त्रिकालाबाधित सत्य आयपीएलधारक क्रिकेटपटूना कसं पचनी पडणार, हीच खरी ग्यानबाची मेख आहे.
आता आपण आपल्या पराभवाच्या कारणमीमांसाकडे वळूया. राजकारणात आधारवड शरद पवार साहेब आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यातील चाणक्य नीतीत कोण श्रेष्ठ, यावर मतमतांतरे असू शकतात. परंतु ज्यावेळी भारताचे हेड कोच गौतम गंभीर साहेबांनी ज्यावेळी पदभार सांभाळला त्यावेळी ते चाणक्य नीतीचा वापर करत भारतीय कसोटी क्रिकेटला वेगळाच आयाम देतील असं वाटलं होतं. परंतु त्यांच्यातील चाणक्य नीती भिंग लावून शोधावी इतपत परिस्थिती येऊन ठेपली. तुमच्याकडे तीन ते चार ऑलराऊंडर कसोटी क्रिकेटमध्ये कशाला आणि का, हा प्रश्न नवख्या क्रिकेट रसिकाच्या मनात येणारच. तुमच्याकडे तिसऱ्या नंबरवर स्पेशालिस्ट फलंदाज नाही. या पूर्ण मालिकेत भारतीय फलंदाज धनंजय माने इथेच राहतात का, असं म्हणत (अशी ही बनवाबनवीमधील प्रसिद्ध संवाद) ड्रेसिंग रूमचा दरवाजा ठोठावत होते. परंतु दुर्दैवाने ड्रेसिंग रूममध्ये धनंजय मानेची भूमिका वठवणारा कोणीच नव्हता. अर्थात याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर्णधार आणि कोचच जबाबदार असतो. टेनिसमध्ये जसा नॉनप्लेइंग कप्तान असू शकतो, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये कोच हा नॉनप्लेइंग कप्तानाच्या भूमिकेतच असतो. त्यांनी बांधलेले अंदाज, आखाडे सत्यात उतरवण्याचे काम प्रशिक्षकांचं असतं. याबाबतीत मात्र गौतम गंभीरने आपल्याला धोका दिलाय.
क्रिकेट कधी कोणाला डोक्यावर चढवेल आणि कधी पायदळी तुडवेल हे सांगता येत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गौतम गंभीर. 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011 वनडे वर्ल्ड कप, 2024 चॅम्पियन्स ट्रॉफी या मेगा इव्हेंटमध्ये प्रमुख भूमिकेत असलेले गौतम गंभीर मात्र मागील एक वर्षात खलनायकाच्या रूपात दिसू लागलेत. ज्याने एक दशकापूर्वी आपल्या आयुष्यात मैलाचा दगड गाठला होता त्याच व्यक्तीला ‘कोई पत्थर ना मारो मेरे दीवाने को’ हे गीत गुणगुणण्याची वेळ आली आहे. पत्रकार परिषदेमध्ये गौतम गंभीर यांनी गंभीरतेने या मालिका पराभवास सर्वप्रथम मी जबाबदार आहे हे कबूल केलं. परंतु कधी कधी चुकीला माफी नसते. त्याचं प्रायश्चित्त हे घ्यावंच लागतं. असो.
पुढील दोन महिन्यानंतर टी-20 वर्ल्ड कपची मोठी जत्रा भारतात भरणार आहे. चौकार-षटकार जिकडे तिकडे बघायला मिळतील. कदाचित आफ्रिकेविरुद्ध दोन-शून्याने आपण हरलो होतो हेही विसरले जाईल. कारण आपण अनुभवातून शहाणे कधीच होत नाही. याला भारतीय क्रिकेटचा इतिहास साक्ष आहे. जाता जाता मला 1990 च्या दशकातील बिशनसिंग बेदी यांची आठवण झाली. त्याकाळी असाच पराभवाचा सिलसिला चालू होता. त्याकाळी बिशनसिंग बेदी यांनी एक वक्तव्य केलं होतं. ते कमालीचं चर्चित राहिलं होतं. भारतीय संघाला अरबी समुद्रात बुडवा, असं ते वक्तव्य होतं. भविष्यात असंच काहीसं वक्तव्य कोणाच्या मुखी आलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका! तूर्तास दक्षिण आफ्रिकेचं त्रिवार अभिनंदन!
विजय बागायतकर