For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता लक्ष सुपर एटकडे!

06:36 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
आता लक्ष सुपर एटकडे
Advertisement

चला, बघता बघता आता एक टप्पा विश्वचषकाचा संपला. ज्या टप्प्यामध्ये काही संघ आपल्या बळावर तर काही संघ आयजीच्या जीवावर बायजी उदार होत तर काही संघ निसर्गाचा आधार घेत सुपरएटपर्यंत पोहोचले. या स्पर्धेच्या माध्यमातून काही संघांना अनपेक्षित धक्के मिळाले, जे अपेक्षित नव्हते. (न्यूझीलंड संघ) अर्थात या गोष्टींची क्रिकेटप्रेमींना सवय झाली आहे, हेही तेवढेच खरे. आता ही स्पर्धा अमेरिकेत नाहीये तर ती कॅरेबियन बेटावर रंगणार आहे. परंतु ही स्पर्धा संपता संपता किवीच्या लॉकी फर्ग्युसनने मात्र कमाल केली. काल मी माझा मित्र महेश डोंगरे यांना फोन केला, जो न्यूझीलंड क्रिकेटचा निस्सीम चाहता. नाण्याची एक बाजू जर भारत असेल तर दुसरी बाजू त्याची न्यूझीलंड आहे. तो म्हणत होता, न्यूझीलंड संघ हरलाय खरा परंतु जाता जाता लॉकी फर्ग्युसनच्या नावाने आनंदही देऊन गेलाय. एखाद्या पराभूत संघातून आनंद कसा शोधावा, हे त्याने मला काल समजावलं. असो. ग्रुप सामन्यात ऑस्ट्रेलिया, भारत आणि द. आफ्रिका या संघांनी आपल्या विजयाचा आलेख चढता ठेवलाय. जाता जाता इंग्लंडलाही बऱ्यापैकी जॅकपॉट लागला.

Advertisement

मी वर म्हटल्याप्रमाणे सुपरएटचे सर्व सामने कॅरेबियन बेटावर होणार आहेत. येथील मैदाने ही अमेरिकेच्या मैदानाच्या अगदी विऊद्ध आहेत. इथे मंदगती गोलंदाजांना निश्चितच आपली चुणूक दाखवण्यासाठी वाव आहे. भारतीय संघाचा विचार केला तर ग्रुप स्टेजच्या सामन्यात थोडेसे प्रयोग निश्चित केलेत. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश आलं आहे, असं म्हणता येणार नाही. परंतु सुपरएटमध्ये ते प्रयोग नको. रवींद्र जडेजाला विश्राम देत यशस्वी जैस्वालला सलामीला पाचारण करायला हवं. दुसरीकडे कोहलीचे सलामीचे प्रयोग पुरे झालेत. त्याला त्याच्या नैसर्गिक स्थानावर खेळू दे. ज्या तीन नंबरवर त्याने आतापर्यंत खोऱ्याने धावा जमवल्यात, त्याच नंबरवर आता त्याला पसंती द्यायला हवी. ही स्पर्धा सुरू होण्याअगोदर मी भारतीय संघाला या स्पर्धेचा फेवरेट म्हणून बघत नव्हतो. परंतु सुपरएटमध्ये प्रवेश होताच आशा थोड्याशा पल्लवीत झाल्या आहेत. पहिली लढत ही डार्क हॉर्स असणाऱ्या अफगाणिस्तान संघाशी आहे. हा संघ मोठ्या स्पर्धेत उलथापालथ करू शकतो हे त्यांनी एकदिवशीय विश्वचषक स्पर्धेत दाखवून दिले होते. चांगल्या दर्जाचे स्पिनर्स हे त्यांच्यासाठी तुरपाचे एक्केच. दुसरा सामना हा बांगलादेशविऊद्ध आहे. बांगलादेश संघाची आठवण काढली की 2007 मधील नकोसे वाटणारे हे वर्ष आपल्या डोळ्यासमोर तरळून जाते. तिसरा सामना हा कांगारूविऊद्धचा. मी 1983 पासून वर्ल्ड कप पाहतोय, किंबहुना अनुभवतोय. लॉईडच्या वेस्टइंडीज संघानंतर  दादागिरी करणारा संघ म्हणजे ऑस्ट्रेलिया. ज्या अॅलन बॉर्डरने विजयाचा पाया रचला, त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत स्टीव्ह वॉने विजयाची पालखी अगदी दिमाखदारपणे फिरवली. काल-परवा अगदी कुणाच्याही ध्यानीमनी नसताना सुद्धा ऑस्ट्रेलिया संघ वर्ल्ड चॅम्पियन बनला. एकंदरीत काय तीन वेगवेगळ्या तऱ्हेच्या देशांशी वेगवेगळे डावपेच रचत भारतीय संघाला विजयाला गवसणी ही घालावीचं लागेल.

आजपासून सर्वोत्कृष्ट आठ संघांसाठी लढती सुरू होत आहेत. पहिला सामना अमेरिकेचा दक्षिण आफ्रिका या तगड्या संघाशी आहे. मायदेशात फुटलेल्या पालवीला मोहोर येतो की नाही हे बघणं आता क्रमप्राप्त ठरणार आहे. अमेरिकन संघाचा खऱ्या अर्थाने इथे कस लागणार आहे. इथे जर अमेरिका तावून सुलाखून निघाली तर मात्र निश्चितच सुपरएटमधील लढाई अधिक रंगतदार होणार, यात काही शंका नाही. तूर्तास तरी सुपरएटमधील प्रत्येक सामना रोमहर्षक, रंगतदार बघायला मिळो  हीच अपेक्षा

Advertisement

Advertisement
Tags :

.