महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कव्हर ड्राईव्ह : इंग्लंड संघाने स्पर्धेतील रंगत वाढवली!

06:00 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुपर एटमधील वेस्टइंडीज विऊद्ध इंग्लंड हा सामना सुरू होण्याअगोदर आपण जर दोन्ही संघांवर नजर टाकली तर दोन्ही संघांनी दोन वेळा विश्वचषकावर नाव कोरलं होतं. एका बाजूने वेस्टइंडीज अगदी निर्विवादपणे किंबहुना अगदी थाटामाटात सुपरएटमध्ये दाखल झाला होता. तर दुसरीकडे इंग्लंड दुसऱ्यांचे कुबडे घेत सुपरएटमध्ये कसाबसा दाखल झाला होता. परंतु इंग्लंडने विंडीजविऊद्धच्या सुपरएटच्या पहिल्याच सामन्यात अशा पद्धतीने खेळ केला जणू ग्रुप स्टेजमध्ये काही घडलंच नाही. ऑस्ट्रेलियाचे  ज्येष्ठ क्रिकेट समालोचक रिची बेनॉ म्हणतात तेच खरं आहे. तुम्ही एकदा बोट दिलं की तुमचा हात हा पकडला जाणार. नेमकं काल तेच घडलं. जो इंग्लंड संघ ग्रुप स्टेजमध्ये विजयाची अक्षरश: भीक मागत होता त्याच इंग्लंड संघाने यजमान विंडीजला अक्षरश: लोळवलं. तेही त्यांच्याच क्रिकेटप्रेमीच्या साक्षीने.

Advertisement

गंमत बघा, विंडीज संघाचा विचार केला आणि या डॅरेन सॅमी  खेळपट्टीचा जर विचार केला तरी या खेळपट्टीवर मागील पाच सामन्यात विंडीजने विजय मिळवला होता. त्यामुळे साहजिकच सामना सुरू होण्याअगोदर विंडीजचा संघ हा मानसिकरित्या निश्चितच कणखर होता. परंतु घडलं मात्र काही वेगळेच. जे अपेक्षित असतं ते घडत नाही, त्यालाच क्रिकेट म्हणतात आणि ही बाब काल क्रिकेटने सिद्ध केली. विश्व कपसारख्या मोठ्या स्पर्धेत ज्यावेळी एखादा संघ सुपर एटसारख्या स्टेजमध्ये जाऊन स्थित्यंतर करतो. आणि ग्रुपमधील एका यशस्वी संघाला पराभवाचे तोंड बघावं लागतं त्यावेळी खऱ्या अर्थाने त्यांच्यासमोर नामुष्की ओढवते. नेमकं तेच काल वेस्टइंडीजबाबत घडलं.

Advertisement

डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर एकंदरीत आतापर्यंत 21 सामने खेळले गेले होते. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणारा संघ अकरा वेळा जिंकला होता. दुसऱ्यांदा फलंदाजी करताना दहा वेळा जिंकला होता. त्यातच या खेळपट्टीवर चालू विश्वचषक स्पर्धेत तीन सामने खेळले गेले होते. आणि जवळपास प्रत्येक सामन्यात 200 च्या वर धावा निघाल्या होत्या. नाणेफेक इंग्लंडने जिंकत विंडीजला प्रथम फलंदाजी देत त्यांचं आदरातिथ्य केलं. जिथे 200-210 धावा धावफलकावर बघायला मिळाल्या असत्या तिथे मात्र 180 चा टप्पा गाठता आला.

हा टप्पा पार करताना फिल सॉल्ट आपल्या संघासाठी मिठासारखा जागला. चौकार-षटकारांची आतषबाजी करत विंडीज संघातील हवाच काढून घेतली. आणि बघता बघता यजमान विंडीज संघ दरीत कोसळला ते त्यांना कळलंच नाही. सॉल्टने ज्या पद्धतीने धावांचा रतीब टाकला त्याचवेळी विजयाचा शिक्का बसला होता. गंमत बघा, आता या विश्वचषक स्पर्धेचा जो आलेख आहे सुऊवातीपासूनच कधी वर कधी खाली बघायला मिळाला आहे. सुऊवात तर त्याची अमेरिकेने केली होती. आणि जो इंग्लंड संघ बघता बघता या स्पर्धेच्या बाहेर गेला होता, त्याच इंग्लंड संघाने वेस्टइंडीजला जोर का धक्का धीरे से लगे, म्हणत उपांत्य फेरीच्या प्रवेशाबद्दल साशंकता निर्माण केली आहे. दुसरीकडे मात्र इंग्लंडने या विजयासह उपांत्य फेरीचा दरवाजा अर्धा का होईना त्यांनी उघडलाय.

इंग्लंडच्या विजयाने मात्र या ग्रुपमध्ये गुंतागुंत वाढवली आहे. त्यातच जर अमेरिकेने इंग्लंडला हरवलं आणि दुसरीकडे विंडीजने जर आफ्रिकेला हरवलं तर मात्र टी-20 सारख्या क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये खऱ्या अर्थाने कळस गाठला जाईल. अर्थात क्रिकेटला जर तरला काही महत्व नसतं हेही तेवढेच खरं. बघायचंय नेमका कुठला संघ फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेतोय. क्रिकेट फॅन्सने इंग्लंडला गृहीत धरू नये एवढं मात्र या मॅचने ठणकावून सांगितले.

विजय बागायतकर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article