For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-झिंबाब्वे पहिला टी-20 सामना आज

06:58 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत झिंबाब्वे पहिला टी 20 सामना आज
Advertisement

वृत्तसंस्था/फरारे

Advertisement

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला येथे शनिवारपासून प्रारंभ होत आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारताच्या नवोदित युवा संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहिल. यजमान झिंबाब्वे आणि भारत यांच्यातील या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 4.30 वाजता प्रारंभ होईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकल्यानंतर आता शौकिनांच्या भारतीय खेळाडूंकडून अधिक अपेक्षा उंचावल्या आहेत. पण झिंबाब्वेच्या दौऱ्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या गैरहजेरीत गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडूंना दर्जेदार कामगिरीसाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांकरिता भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल, रियान पराग, वॉशिंगटन सुंदर, रवी बिस्नॉई, अवेश खान, खलील अहम्मद, मुकेशकुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांचा समावेश आहे. झिंबाब्वेचे नेतृत्व सिकंदर रजाक करत आहेत.

भारत-झिंबाब्वे दरम्यानच्या या टी-20 मालिकेत अनेक नवोदित क्रिकेटपटूंचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण होत आहे. पंजाबचा अभिषेक शर्मा आणि आसामचा रियान पराग यांची आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील कामगिरी अधिक उठावदार झाल्याने निवड समितीने त्यांना झिंबाब्वे दौऱ्यासाठी संधी दिली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, अष्टपैलु रविंद्र जडेजा यांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर आता निवड समिती भारतीय संघाच्या पुर्नबांधणी करता नवोदित खेळाडूंना संधी देत आहे. झिंबाब्वेचा संघ म्हणावा तसा भक्कम प्रतिस्पर्धी नसला तरी ही मालिका त्यांच्या देशामध्ये खेळविली जात असल्याने भारताला गाफील राहून चालणार नाही.  सिकंदर रझाने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधीत्व केले होते.

Advertisement

झिंबाब्वेमधील या मालिकेकरिता पहिल्या दोन सामन्यांसाठी शिवम दुबे, संजू सॅमसंग आणि यशस्वी जैस्वाल उपलब्ध झालेले नाहीत. आता ते या मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसाठी उपलब्ध राहतील. भारतीय टी-20 संघाच्या नव्या कर्णधाराचा शोध सुरू असून हार्दिक पांड्या, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत यांच्याकडे पाहिले जाते. 2026 सालातील आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात होणार असल्याने यजमान संघाच्या रिक्त झालेल्या कर्णधाराची निवड लवकर करणे जरुरीचे आहे. शनिवारी होणाऱ्या या सामन्यात कर्णधार गिल आणि अभिषेक शर्मा हे भारताच्या डाव्याला प्रारंभ करतील. ऋतुराज गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येईल, अशी अपेक्षा आहे. रियान परागला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळेल, असे वाटेल. गेल्या काही दिवसांपासून टी-20 प्रकारामध्ये रिंकू सिंग हा संघातील उत्तम फिनिशर म्हणून ओळखला जातो. त्याला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस पाठविण्याची शक्यता आहे. या मालिकेसाठी पहिल्या दोन सामन्यात जुरेल आणि जितेश शर्मा यापैकी एकाला यष्टीरक्षणाची संधी मिळेल. आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद, तुषार देशपांडे, हर्षित राणा हे भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज असून वॉशिंगटन सुंदर, बिस्नॉई हे फिरकी गोलंदाज आहेत.

भारतीय संघ- शुभमन गिल (कर्णधार), गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल, रियान पराग, वॉशिंगटन सुंदर, रवी बिस्नॉई, आवेश खान, खलील अहमद, मुकेशकुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा, हर्षित राणा

झिंबाब्वे संघ-सिकंदर रझा (कर्णधार), फराज आक्रम, बेनेट, कॅम्पबेल, छेत्रा, जाँग्वे, ईनोसेंट केया, क्लाईव्ह मदांडे, मधवेरे, मेरुमनी, मासाकेझा, मेहुटा, मुझारबनी, मेयर्स, ए. नक्वी, निगरेव्हा आणि मिल्टन शुंभा

सामन्याची वेळ : दुपारी 4.30 वाजता

थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन 3, 4, 5

Advertisement
Tags :

.