दिल्लीतील दरबारी
सत्तेत कोणी का असेना, काँग्रेस असो वा भाजप एकमात्र सर्वांच्या पायलीला पुसलेले आहे. ते म्हणजे दरबारी. दरबारी अथवा भाट मंडळी हा दिल्लीला जडलेला रोग आहे अथवा शाप आहे. या भाट मंडळींची दिल्लीत कधीच कमी राहिली नाही. मग सत्तेत मोगल असोत अथवा इतर कोणीही. राजेरजवाडे होते तेव्हा पदरी भाट आणि चारण मंडळी पदरी बाळगली जायची. त्यांचे कामच भाटगिरीचे. राजेशाही संपली. इंग्रज देखील निघून गेले. तरी ही जमात अजिबात खतम झालेली नाही. उलट बळावलीच आहे असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही.
जो खुर्चीत बसलेला आहे त्याला विविध प्रकारे खुश करण्याची मोठी जमातच इथे सापडते. दिल्ली भामट्यांची आहे असे उगीचच म्हटलेले नाही. हा भामटा कोणत्या स्वरूपात समोर येईल ते कळत नसते, मामा बनायचे नसेल तर डोळे उघडे ठेवावे लागतात. थोडक्यात काय तर भाट आणि भामट्यांनी दिल्लीला पिडलेले आहे.
ताजेच उदाहरण द्यायचे झाले तर ते संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचेच देता येईल. मोदी सरकारात नेहमी नंबर दोन अथवा तीनचे मंत्री राहिलेले राजनाथ यांना राजधानीच्या राजकीय वर्तुळात ‘नकली राजपूत’ म्हणले जाते. एव्हढ्या महत्त्वाच्या पदावर असले तरी त्यांच्या हातात अजिबात कोणते अधिकार नाहीत हे दिल्लीत गुपित राहिलेले नाही. कॅबिनेट कमिटी ऑन अपॉईंटमेंट्सचे सदस्य असलेले राजनाथ हे सरकारच्या मोठमोठ्या नेमणूकात फक्त ठप्पा लावायचे काम करतात असे सांगितले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे या नेमणूकांच्या पत्रांवर प्रथम स्वाक्षऱ्या करतात. आणि असे होत असेल तर बिचाऱ्या राजनाथना केवळ ठप्पा लावण्याशिवाय काही कामच राहत नाही, असे मानले जाते. राजनाथ यांचा मुलगा पंकज हा उत्तर प्रदेशमध्ये आमदार आहे पण त्यांना गेली 8-9 वर्षे त्याला मंत्री देखील करता येत नाही.
पंतप्रधान 75 वर्षांचे झाले त्यासुमारास राजनाथ यांनी एका वृत्तवाहिनीला इंटरव्यू दिला. त्यात त्यांना विचारण्यात आले की आता मोदी किती काळ पंतप्रधान राहणार? राजनाथ यांनी स्पष्ट केले मोदी 2029 च्या निवडणुकीनंतर, तसेच 2034, 2039, 2044च्या निवडणूका नंतर देखील पंतप्रधान राहणार. 2047 साली स्वतंत्र भारताची शतपूर्ती साजरी होईल तेव्हा ते आपले मिशन पूर्ण करतील. आता हे पंतप्रधानांना खुश करणे नाही तर काय समजावे. कारण त्यावेळी 1950ला जन्मलेले मोदी जवळजवळ शंभरी गाठतील. ज्याची सरशी, तिकडे पारशी, असे म्हणतात त्यातलाच हा प्रकार.
पंतप्रधानांना ऐकायला जे आवडते ते बोलणारे राजनाथ काही एकटे नव्हेत. महाराष्ट्रात कुख्यात पावलेले भाजपचे वादग्रस्त खासदार निशिकांत दुबे देखील अशाच मताचे आहेत. मोदींची तब्येत ठणठणीत आहे अशावेळी त्यांनी देशाच्या प्रमुखपदी का बरे राहू नये? अशा प्रकारचा उलटा सवाल ते जणू विचारतात. राजनाथ सिंग 2013-14 साली भाजपचे अध्यक्ष असताना ‘अब की बार, मोदी सरकार’ अशी घोषणा देण्यात आली आणि भाजपला बाजूला सारले गेले. तेव्हापासून आत्तापर्यंत केंद्रातील सरकार मोदींचे सरकार म्हणूनच ओळखले जात आहे.
आणीबाणीच्या दिवसात काँग्रेस अध्यक्ष असलेले देवकांत बारुआ हे इतिहासाचे एक विद्वान प्रोफेसर होते. पण सत्तेत राहण्यासाठी त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी ‘इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया’ अशी घोषणा देऊन स्वत:ला दरबारी राजकारण्यांचे सम्राट बनवले. पुढे ज्यांना राष्ट्रपती बनवले गेले ते झेल सिंग यांनी इंदिरा गांधींच्या घरी झाडू मारण्याचे काम करण्याची आपली तयारी आहे असे सांगितले होते. 1976 साली आणीबाणीचा परमोत्कर्ष असताना एन. डी. तिवारी यांनी संजय गांधींच्या चपला उचलल्या होत्या असे बोलले जाते. दरबारी राजकारणाचा हा नमूना बरेच काळ गाजला होता.
कंगना रनौत या अभिनेत्री म्हणून जबरदस्त काम करत असल्या तरी भाजपच्या एक खासदार म्हणून त्यांनी वरचेवर तारे तोडून आपली स्वामीभक्ती वेगळ्या प्रकारे दाखवलेली आहे. 2014 साली मोदी पंतप्रधान झाल्यावर भारताला खरे स्वातंत्र्य मिळाले या त्यांच्या विधानाने बराच गहजब माजवला होता. आता अचानक लोकांच्या नजरेआड झालेले माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी वारंवार पंतप्रधानांच्या स्तुतीचे एव्हढे पूल बांधले की ते पुढील राष्ट्रपती बनण्यास जणू सज्ज झाले आहेत असेच भासू लागले. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला / द्यायला लावलेल्या धनखड यांनी स्वत:चेच हसू करून घेतलेले आहे. कोणत्याही उपराष्ट्रपतीची अशी शोभा झाली नव्हती. एकेकाळी कंगना यांच्यासारखा राजकीय रुबाब असणाऱ्या स्मृती इराणी या निवडणूक हरल्याने अडगळीत पडलेल्या आहेत. त्यांनी मुंबईत जाऊन परत टीव्ही मालिकेत काम सुरु केले आहे.
खुशवंत सिंग यांनी एका पुस्तकात म्हटल्याप्रमाणे दिल्लीची चाल नेहमी चवचालच राहिलेली आहे. पुराणकाळापासून जो कोणी सत्तेत राहिला मग तो सम्राट असो अथवा राजा त्याच्या पायी तिने लोळण घेतलेली आहे, त्याची शय्या सजवली आहे. या भाट मंडळींनी तसेच भामट्यांनी छोट्या-मोठ्या मंत्र्यांना अथवा माननीय खासदारांना देखील सोडलेले नाही. ही भामटे मंडळी दिल्लीत नवख्या असलेल्या नेत्यांच्या घरात पी ए अथवा लेखनिक म्हणून घुसतात आणि नंतर त्या घराचा अक्षरश: ताबा घेतात. काही नेत्यांचा तर त्यामुळे दिल्लीत घरोबा झालेला बघायला मिळाला आहे/मिळत आहे व अशात सत्ताधारी देखील आहेत व विरोधी पक्षातील.
जनता पक्षाच्या काळात एक नवा चेहरा म्हणून उदयास आलेल्या नेत्याचा दिल्लीत जो ‘दुसरा संसार’ सुरु झाला. त्यामुळे त्याच्या राज्यातील खेड्यात असलेल्या पत्नीला तो जवळजवळ विसरला हेदेखील राजधानीने पाहिले आहे. त्याच्या या दिल्लीतील घरोब्यातून जन्माला आलेला मुलगा त्याचा राजकीय वारस बनलेला आहे.
भाजपच्या मुख्यमंत्र्यात एखादे योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस सोडले, तर होयबांचाच भरणा आहे आणि त्यामुळे नवीन प्रश्न निर्माण झालेले आहेत. ओडिशासारख्या राज्यात मुख्यमंत्रीपदाचे स्पर्धक भरपूर असल्याने जो प्रत्यक्ष मुख्यमंत्री आहे त्याला राज्यच करता येत नाही. तर उत्तराखंडमध्ये निवडणूक हरलेल्या पुष्कर सिंग धामीला परत मुख्यमंत्री बनवल्याने आत धुसफूस सुरु झालेली आहे. आता कर्तृत्वाशिवाय झालेले नेते आपली खुर्ची वाचवण्यासाठी भाट बनणारच. राजस्थानचे मुख्यमंत्री मोहनलाल शर्मा हे त्यातीलच एक. त्यांना घालवण्यासाठी त्यांचे पक्षांतर्गत विरोधक एकत्र होत असताना माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे अशोक गेहलोत हे त्यांचे समर्थक बनलेले आहेत हे राजकीय भामटेगिरीचे उदाहरण आहे. मोहनलाल जितके जास्त राहतील तितके भाजपचे नुकसान होणार आणि त्यानंतर आपल्याला रान मोकळे असा गेहलोत यांचा होरा आहे. कधीकाळी काँग्रेसचे असलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंत शर्मा हे निवडणूक जवळ आल्यावर धास्तावलेले आहेत. त्यांना जळी स्थळी काष्टी राहुल गांधी दिसत आहेत.
आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना भाजपचा नवीन अध्यक्ष करण्याचा घाट घातला जात आहे. तो किती यशस्वी होईल अथवा नाही हे नजीकच्या काळात दिसून येईल. पण असे झाले तर मोदी-शहा यांचा एक ‘होयबा’ च पक्षाच्या अध्यक्षपदी बसेल अशी चर्चा सुरु झाली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे निर्मला यांनी केवळ 15 वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केला आहे. वादग्रस्त मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी ज्याप्रकारे कारभार चालवून पूर्ण निवडणूक आयोगाला एक थट्टेचा विषय बनवलेला आहे तेदेखील राजधानीतील दरबारी संस्कृतीचेच देणे आहेत.
गृहमंत्री अमित शाह यांच्या खास विश्वासातील अधिकारी म्हणून एकेकाळी ओळखले जाणारे ज्ञानेश हे आयोगाचे मुख्य बनून देखील सरकारचीच सेवा करत आहेत. एव्हढेच नव्हे तर जसे जमेल तसे ते विरोधी पक्षांवर दुगाण्या झाडत आहेत. अशा दरबारी मंडळींमुळे सरकारची विश्वासार्हताच कमी होत चाललेली आहे.
सुनील गाताडे