कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जमीन हडप करणाऱ्या एजंटांना न्यायालयाचा दणका

11:06 AM Jul 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर तालुक्यात एजंटांचा सुळसुळाट-जमीन हडप करण्याच्या घटनांत वाढ : मोठमोठ्या कंपन्यांच्या संपर्कात एजंट

Advertisement

खानापूर : तालुक्यातील जमिनी हडप करण्यासाठी एजंट वेगवेगळ्या पद्धतीने सक्रिय झाले आहेत. अनेकांच्या जमिनी हडप करण्याची प्रकरणे उघडकीस येत आहेत. तरीही एजंटांचे कारनामे काही थांबता थांबेनात. कणकुंबी परिसरातील आठ एकरपैकी चार एकर जमीन हडप करण्याच्या प्रकरणात न्यायालयाने या जमिनीच्या नावात अथवा इतर कोणतेही फेरबदल अथवा हस्तक्षेप करण्यास मनाई आदेश दिल्याने एंजटांचे धाबे दणाणले असले तरी एजंटांचा सुळसुळाट कायम आहे. तालुक्यातील पश्चिम भागातील दुर्गम तसेच घनदाट जंगलात जमीन वेगवेगळ्या प्रकारे हडप करण्याची प्रकरणे उघडकीस येत आहेत. हुळंद येथील जमिनीप्रकरणी सर्वेक्षण विभागातील तीनजणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच विविध तहसीलदार कार्यालयातील आणि भूमी विभागातील तसेच उपनोंदणी कार्यालयातील एजंटांचे कारनामे काही थांबता थांबेनात.

Advertisement

कणकुंबी ग्राम पंचायत हद्दीतील पारवाड रस्त्याच्या आतील बाजूस लखम शेतवाडा येथील 8 एकर जमिनीत वाडेकर कुटुंबीयांच्या 29 जणांचा हक्क आहे. असे असताना वाडेकर कुटुंबीयातील दीपक वाडेकर याने काही एजंटांना हाताशी धरुन यातील चार एकर जमीन परस्पर लाटण्यासाठी ग्रा. पं. पीडीओना हाताशी धरुन या जमिनीचे ईसत्तू उतारे तयार करून ही जमीन परस्पर विकण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच या जमिनीवर रिसॉर्ट तसेच स्वीमिंग पूल आणि छोटे छोटे कॉटेजीस उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यासाठी खानापूर आणि बेळगाव परिसरातील काही धनाड्यानी मोठी रक्कम दीपक वाडेकर यांच्या माध्यमातून या जमिनीच्या विकासासाठी लावली आहे. जेंव्हा या जमिनीचा विकास सुरू झाला. तेंव्हा वाडेकर कुटुंबीयांनी ग्राम पंचायतीत विचारपूस केली असता वेगवेगळी ईसत्तू उतारे करण्यात आले असल्याची माहिती मिळताच न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने बाजू ऐकून घेऊन संपूर्ण वाडेकर कुटुंबीयांचा या जमिनीवर हक्क जाहीर केला असून या जमिनीवर कोणतेही बांधकाम अथवा उताऱ्यातील रेकॉर्ड बदल करण्यात येऊ नयेत, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे एजंटांच्या जमीन हडप करण्याच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. याबाबत वाडेकर कुटुंबीयांच्यावतीने एस. के. नंदगडी यांनी न्यायालयात बाजू मांडली आहे.

पश्चिम भागातील जमिनींवर एजंटांचा डोळा

तालुक्यात जमिनी हडप करण्यासाठी एजंट कार्यरत असून काही जमिनी मोठमोठ्या कंपन्यांच्या घशात घालण्यासाठी हे एजंट वेगवेगळ्या माध्यमातून सक्रिय आहेत. खानापूर तालुक्यातील जंगल विभागात असलेली मालकी जमीन ही पोलाद निर्मिती कारखान्याना जंगल दाखवण्यासाठी हवी आहे. त्यासाठी एजंट पश्चिम भागातील जमिनी वेगवेगळ्या माध्यमातून हडप करून या कंपन्यांच्या घशात घालण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे पश्चिम भागातील अनेक शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. आणि प्रकरणे उघडकीस आल्यानंतर न्यायालयात दाद मागण्यात येत आहे. मात्र काही प्रकरणात शेतकऱ्यांना वेगळ्या प्रकारे व्यवहारात गोवून जमिनी हडप करण्याची प्रकरणे उघडकीस येत आहेत. त्यामुळे सध्या खानापूर तालुक्यात भूमाफियांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article