लालू यादव, पुत्रांना न्यायालयाचा दिलासा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बिहारमध्ये काही काळापूर्वी गाजलेल्या ‘नोकरीसाठी भूखंड’ घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, तसेच त्यांचे पुत्र तेजस्वी आणि तेजप्रताप यांना रोझ अव्हेन्यू न्यायालयाने दिलासा दिला आहे. या न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज संमत केला आहे. प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यावर त्यांना हा जामीन देण्यात आला आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 ऑक्टोबरला होणार आहे. जामीनावर मुक्तता झाल्यामुळे तेजस्वी यादव यांनी आनंद व्यक्त केला. आपण आणि आपले कुटुंब निदोष असून आमच्या विरोधात राजकीय कारस्थान सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे. तथापि, न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असून आम्हाला न्याय मिळेल आणि करस्थान उध्वस्त होईल, असे प्रतिपादन त्यांनी नंतर केले.
अटक झालेली नव्हती
या घोटाळ्याची चौकशी सुरु झाल्यानंतर या आरोपींना अटक करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज स्वीकारण्यात काहीही वावगे नाही. सर्व आरोपींना न्यायालयाने समन्स पाठविले होते. त्यानुसार ते न्यायालयासमोर उपस्थित झाले आणि त्यांनी रीतसर जामीन अर्ज सादर केला. त्यामुळे त्यांना जामीन संमत करण्यात येत आहे, असे न्या. विशाल गोंगे यांनी निर्णयपत्रात स्पष्ट केले आहे.
प्रकरण काय आहे...
बिहारमध्ये विविध पदांवर राज्य सरकारकडून नोकरी देण्यासाठी भूखंडांची मागणी लाच म्हणून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करुन नोकरी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या मालकीचे असलेले भूखंड किंवा जमीनी विशिष्ट व्यक्तींच्या नावे करुन देण्याची मागणी केली होती, असे आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यावर आणि त्यांचे कुटुंबिय मुख्य आरोपी आहेत. हे प्रकरण 2022 मध्ये बाहेर आले होते