For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोहन हरमलकरला खासगी जेवण देण्यास कोर्टाचा नकार

12:40 PM Oct 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
रोहन हरमलकरला खासगी जेवण देण्यास कोर्टाचा नकार
Advertisement

पणजी : मेरशी येथील सत्र न्यायालयाचे न्या. ईर्शाद आगा यांनी जमीन बळकाव प्रकरणातील संशयित रोहन हरमलकर याचा खासगी जेवणाची मागणी करणारा अर्ज फेटाळला आहे. संशयिताला पोटाचा कोणताही विकार नसून कारागृहात कॅन्टीनची सोय उपलब्ध असल्याचे तुरुंग प्रशासनाचा अहवाल ग्राह्य धरत रोहन हरमलकर याची सदर मागणी नामंजूर करण्यात आली आहे. रोहन हरमलकर याने न्यायालयात अर्ज करून आपल्याला अॅसिडिटी आणि अन्नातून विषबाधा अशा आरोग्य समस्या झाल्याचा दावा केला होता. यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे सांगत त्याने वैयक्तिक जेवण घेण्याची विशेष सवलत देण्याची मागणी केली होती. यावर न्यायालयाने तुरुंग अधीक्षकांना  बाजू मांडण्यास सांगितले. संशयिताला पोटाच्या विकाराची कोणतीही समस्या नाही, मध्यवर्ती कारागृहात कॅन्टीनची सुविधा आहे आणि प्रत्येक कैद्याला आठवड्यातून एकदा आवश्यक त्या वस्तू खरेदी करण्याची परवानगी दिली जाते, असे तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केले.

Advertisement

हरमलकरला एकदा झालेला आरोग्याचा त्रास अन्नातून विषबाधा नव्हती, असेही नमूद करण्यात आले. आरोपीला केवळ अपचनाचा आणि गॅसची समस्या आहे. या सर्व बाबींची दखल घेत न्यायालयाने संशयिताची मागणी फेटाळून लावली. म्हापसा पोलिसांनी 2022 मध्ये हणजूण येथील सर्व्हे क्रमांक 426/5 मधील जमीन हडप केल्याप्रकरणी रोहन हरमलकर विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर, जमीन हडप प्रकरणी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) हणजूणमधीलच सर्व्हे क्रमांक 444/8 मधील 2,450 चौरस मीटर जमिनीप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल केला. या दोन्ही गुह्यांमध्ये मनी लाँड्रिंगचा संशय आल्याने सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या प्रकरणांची दखल घेत तपास सुरू केला होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.