Kolhapur : जेवण न दिल्याच्या रागातून दाम्पत्याचा खून
सराईत गुन्हेगाराकडून वृद्ध दाम्पत्याचा निर्घृण खून
कोल्हापूर : जेवण देण्यास नकार दिल्याच्या रागातून सराईत गुन्हेगार विजय मधुकर गुरव (वय ४० रा. शिरगाव ता. शाहूवाडी) याने लाकडी दांडक्याने व दगडाने ठेचून कंक दाम्पत्याचा खून केल्याची कबुली दिली आहे. शनिवारी त्याला शाहूवाडी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान विजय गुरवला सोमवारी पुन्हा घटनास्थळी फिरवण्यात येणार असून, त्याच्याकडून खुनाची माहिती घेण्यात येणार आहे.
कडवी (ता. शाहूवाडी) धरण पाणलोट क्षेत्रातील गोलीवणे बसाहत येथे रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास निनू यशवंत कंक (वय ७०), त्यांच्या पत्नी रखुबाई निनू कंक (वय ६५) या दोघांचे संशयास्पद मृत्यू झाले होते. झोपडीवजा घरापासून २० मीटर अंतरावर रखुबाई यांचा तर पाण्यामध्ये निनू कंक यांचा मृतदेह आढळून आला होता.
रविवारी सकाळी त्यांचा मुगला सुरेश कंक दिवाळीसाठी आई वडीलांना घरी आणण्यासाठी गेला असता या घटनेचा उलगडा झाला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने या घटनेचा उलगडा करण्यासाठी ऐन दिवाळीत घटनास्थळावर ठिय्या मारला होता. परिसरातील एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विजय गुरवचे नांव निष्पन्न झाल्यानंतर शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) रोजी मुसक्या आवळण्यात आल्या. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने त्याच्याकडे कसून चौकशी केली. विजय गुरव याने खुनाची कबुली दिली, मात्र त्याने कारण सांगताना उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर पोलीस खाक्या दाखविताच त्याने लुटीच्या इराद्याने हा खून केल्याचे सांगितले. मात्र काही वेळातच त्याने जेवण न दिल्याच्या रागातून या दोघांचा खून केल्याची कबुली दिली.
जेवण न विल्याने खून...
विजय गुरव हा मुळचा शाहूवाडी येथील शिरगांवचा आहे. तो गोलीवणे परिसरात फिरत होता. दोन दिवस तो याच परिसरात झोपून दिवस काढत होता. गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास गुरवने कंक दाम्पत्याच्या घरी जाऊन जेवण मागितले.
मात्र, जेवण देण्यास नकार दिल्याच्या रागातून त्याने लाकडी दांडक्याने कंक दाम्पत्याला बेदम मारहाण केली. याच मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा
अटकेतील विजय गुरव हा पोलीस रेकॉ र्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर शाहूवाडी, राजारामपुरी, शहापूर, सांगली, जत पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सांगली येथे २०१४ मध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून तो बाहेर आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे यश
ऐन दिवाळीमध्येच ही घटना घडली होती यामुळे शाहूवाडी तालुक्यातील नागरीक आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये होते. वन विभागाने हा वन्य प्राण्याचा हल्ला नसल्याचे पहिल्यांदाच सांगितले होते. यामुळे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी या घटनेचा छडा लावण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषणला दिल्या होत्या. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने १५ दिवस या परिसरात ठाण मांडून अत्यंत शिताफीने तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला व विजय गुरव याला जेरबंद केले.