अंकोलाजवळ कार अपघातात दाम्पत्य ठार
अन्य तिघे जखमी : मृत अंधेरी-मुंबई येथील रहिवासी
कारवार : धार्मिक विधी आटोपून परतताना कार उलटून दांपत्य ठार तर कारमधील अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात रविवारी अंकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोळे-जमगोडजवळ राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर झाला आहे. मृत दांपत्य अंधेरी-मुंबई येथील असून त्यांची नावे नागेंद्र सदाशिव भटकळ (वय 72) आणि त्यांची पत्नी सुधा नागेंद्र भटकळ (वय 65) अशी आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांची नावे नमीता नित्यानंद नायक (वय 56), दीप्ती विश्वास प्रभू (वय 36) आणि नित्यानंद वामन नायक (रा. मंगळूर) अशी आहेत. दीप्ती प्रभू यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, नागेंद्र सदाशिव भटकळ यांचे कुटुंबीय अंकोला येथील श्री लक्ष्मी नारायण महामाया देवस्थानात धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी आले होते. हे कुटुंबीय गेल्या तीन दिवसांपासून अंकोला येथे वास्तव्य करून होते. रविवारी ते धार्मिक विधी आटोपून मंगळूरला निघाले असताना मंदिरापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावरील बोळे-जमगोड येथे चालकाचे कारवरील नियंत्रण चुकले आणि कार रस्त्याच्या बाजूला उलटी झाली. या कारमध्ये पाच जण अडकून पडले होते. बोळे जमगोड येथील ग्रामस्थांनी तातडीने कारमधील प्रवाशांना बाहेर काढले आणि उपचारासाठी अंकोला सरकारी रुग्णालयात दाखल केले. तथापि, यात नागेंद्र सदाशिव भटकळ व सुधा भटकळ दांपत्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच अंकोलाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर मठपती आणि उपनिरीक्षक सुनील हुल्लोळ्ळी यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. अंकोला पोलीस अधिक तपास करीत आहेत.