मूल होत नसल्याने दाम्पत्याची आत्महत्या
लग्नाच्या वाढदिवशीच विवाहाच्या कपड्यांमध्ये लावला गळफास
नागपूर
लग्नाला अनेक वर्ष होऊनही मूल होत नसल्याने नैराश्यामध्ये नागपूरमधील दाम्पत्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना नागपूरच्या जरीपटका पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मार्टीन नगरमध्ये घडली आहे. घटनेनंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.
येथील जरील आणि अॅनी यांच्या लग्नाला २६ वर्ष होऊनही त्यांना मूलबाळ झाले नाही. तसेच जरील यांची नोकरी गेल्याने ते बेरोजगार होते, त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. यामुळे नैराश्यात जाऊन या दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. जेरील उर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रीप (वय ५४) आणि अॅनी जेरील मॉनक्रीप ( वय ४५) अशी या दोघांची नावे आहेत.
दाम्पत्याने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशीच गळफास लावून आत्महत्या केल्याचे समजत आहे. या दोघांनी आत्महत्या करण्याआधी सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओतून त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले. आणि आत्पेष्टांना कार्य पुढे ढकलू नका अशी विनंती केली. काही वर्षांपूर्वी जेरील हे शेफ चे काम करत होते तर त्यांची पत्नी अॅनी घरकाम करत होती. काही काळापासून जेरील हे बेरोजगार होते त्यांच्यावर कर्जही खूप होतं.
या दोघांचा ६ जानेवारीला लग्नाचा वाढदिवस असल्याने हे दोघेही दिवसभर अगदी सहज लोकांमध्ये वावरत होते. मध्यरात्रीनंतर त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. दुसऱ्यादिवशी (मंगळवारी) सकाळी १०.३० वाजेपर्यंत दरवाजा बंद असल्याने शेजारच्यांनी आवाज दिला. तरीही काही प्रतिक्रिया नसल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले, तर हे दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी त्वरीत पोलिसांना या प्रकारणाची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा करण्यास सुरुवात केली.