पहिल्या पत्नीच्या नातेवाईकांकडून दाम्पत्यास मारहाण
सांगली :
पोलिसात आपल्याविरोधात तक्रार दिल्याचा राग आल्याने संशयित पाचजणांनी एका दाम्पत्यास मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. संशयितांनी पतीला लोखंडी पाईपने चोपल्याने तो जखमी झाला आहे. ही मारहाण ८ मे रोजी दुपारी घाडगे-पाटील शोरुमसमोरील अपार्टमेंटमधील मोकळ्या गाळ्यात घडली.
यामध्ये हुसेनबादशाह मगबुल सय्यद (रा. अमननगर दर्गा मोहोल्ला, मालगाव रस्ता, मिरज) आणि त्याची दुसरी पत्नी फरहानाज सय्यद हे दोघे जखमी झाले. दरम्यान पोलिसांनी संशयित अंजुम हुसेनबादशहा सय्यद (रा. अमन नगर, मिरज), सासरे मौला मुजावर, सासू शहनाज मौला मुजावर (दोघे रा. मालगाव), चुलत मेव्हणा गरीब नवाज मुल्ला (रा. अमननगर, मिरज) आणि मध्यस्थ फारुक मुल्ला (रा. शंभर फुटीर रस्ता) यांच्यावर गुन्हा दाखल केला.
फिर्यादी हुसेनबादशाह सय्यद यांची पत्नी फरहानाज हिने संशयितांविरोधात मिरज शहर पोलीसात तक्रार दिली होती. तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने चिडलेल्या संशयितांनी दांपत्यास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.