फसवणूक प्रकरणी दाम्पत्याला अटक
फसवणुकीचा आकडा कोटीच्या घरात, शेकडो महिलांची पालकमंत्र्यांकडे धाव
बेळगाव : फायनान्समधून महिला स्वसाहाय्य संघांना कर्ज देऊन सुमारे 2 हजार जणांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका दाम्पत्याला मंगळवारी काकती पोलिसांनी अटक केली आहे. यल्लव्वा कमलेशकुमार बन्नीबागी (वय 38) आणि कमलेशकुमार हालाप्पा बन्नीबागी (वय 38, दोघेही रा. हालभावी) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करून तपास चालविला आहे. दरम्यान फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी शेकडो महिलांनी काँग्रेस भवन येथे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना घेराव घालून गाऱ्हाणे मांडले. अधिवेशन संपल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई करून पैसे परत देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पालकमंत्री जारकीहोळी यांनी दिले. मल्लव्वा आणि कमलेशकुमार हे दोघे पती-पत्नी असून गेल्या काही वर्षांपासून ते हलभावी येथे वास्तव्यास आहेत. ते वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांमधून महिला स्वसाहाय्य संघांना कर्ज उपलब्ध करून देत होते.
प्रत्येकी कर्जदाराकडून कमिशन म्हणून दोन हजार रुपये तर कर्ज मंजूर झालेल्या रकमेतील 25 टक्के रक्कमही ते घेत होते. 50 हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाल्यास त्यापैकी 25 हजार रुपये कर्जदारांनी त्यांना द्यावे लागत होते. कर्जाचे सर्व हप्ते आम्ही भरतो, असे सांगून त्यांनी काही हप्ते भरले. त्यानंतर पुढील हप्ते न भरल्याने महिला स्वसाहाय्य संघातील कर्जदार अडचणीत आले. त्यामुळे वरील दाम्पत्याकडे कर्ज भरण्यासाठी तगादा लावला. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त कर्जदारांनी सोमवारी हलभावी येथे वरील दाम्पत्याच्या घराला घेराव घालून जाब विचारला. तसेच काकती पोलीस ठाण्यालाही घेराव घालण्यात आला. याप्रकरणी काकतीचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद यांनी स्वत: सरकारतर्फे फिर्याद दिली. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून मंगळवारी अटक केली. न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार या दाम्पत्याने दोन हजारहून अधिक जणांना गंडा घातला असून ही रक्कम पाच ते सहा कोटींच्या घरात असण्याचा अंदाज आहे. फसवणुकीचा आकडा जास्त असल्याने हे प्रकरण अधिक तपासासाठी सीओडीकडे वर्ग केले जाण्याची शक्यता आहे. त्यातच मंगळवारी हलभावी व परिसरातील महिला संघाच्या कर्जदारांनी काँग्रेस भवन येथे धाव घेऊन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे आपली कैफीयत मांडली.