For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मिझोराममध्ये सत्तापालट

06:55 AM Dec 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
मिझोराममध्ये सत्तापालट
Advertisement

झेडपीएम 27 जागांसह विजयी, ललदुहोमा मुख्यमंत्री होणार?

Advertisement

वृत्तसंस्था/ ऐझवाल

उत्तर पूर्वेकडील राज्य मिझोराम राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून राज्यात सत्तापालट झाला आहे. ललदुहोमा यांच्या नेतृत्वाखालील झोराम पीपल्स मुव्हमेंट या पक्षाने 27 जागांवर विजय मिळवत बहुमतासह दणदणीत विजय मिळविला आहे. यांच्याविरोधात लढणाऱ्या मिझो नॅशनल फ्रंट या पक्षाला केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर भारतीय जनता पक्षाने राज्यात 2 जागांवर विजय मिळविला आहे. राज्याचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी पदाचा राजीनामा राजभवनात राज्यपाल डॉ. हरीबाबू कंभंपती यांच्याकडे सुपूर्द केला आहे. आता झोराम पीपल्स मुव्हमेंटचे प्रमुख ललदुहोमा राज्यपालांची एक दोन दिवसात भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.

Advertisement

पाच राज्यापैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल रविवार 3 डिसेंबरला लागला आहे. पण मिझोराम राज्याची मतमोजणी मात्र सोमवारी घेण्यात आली. यामध्ये झेडपीएमचे (झोराम पीपल्स मुव्हमेंट) मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ललदुहोमा हे सरचिप मतदारसंघामधून 2,982 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्याविरोधात एमएनएफ पक्षाचे (मिझो नॅशनल फ्रंट) जेजे मालसावमंजुआला वानचंग हे पराभूत झाले आहेत. झेडपीएम पक्षाने राज्यातील कोलासीब, चालफिल, तावी, ऐझवाल उत्तर 2, ऐझवाल पश्चिम 1, ऐझवाल पश्चिम 2, ऐझवाल पश्चिम 3, ऐझवाल दक्षिण 1, ऐझवाल दक्षिण 3, लेगटेंग, तुईंचंग, चंपाई उत्तर, ट्यूकुम, ऱ्हांनटूरझो, दक्षिण तुईपुई, लुंगलेई पश्चिम, लुंगलेई दक्षिण, लाँगतलाई पूर्व या मतदारसंघामध्ये विजय प्राप्त केला आहे.

भाजपच्या कामगिरीत सुधारणा

दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने पालक आणि सैहा या विधानसभा मतदारसंघामध्ये विजय मिळविला आहे. भाजपचे के. ऱ्हामो पालक मतदारसंघातून 1241 मतांनी विजयी झाले आहेत. एमएनएफचे उमेदवार के. टी. रोखाव यांचा त्यांनी पराभव केला. सैहा मतदारसंघामध्ये भाजपच्या के. बिचुआ यांनी एमएनएफचे उमेदवार लालमालसवमा झसाई यांचा 616 मतांनी पराभव केला. मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये भाजपने या ठिकाणी एक जागा अधिक जिंकली आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला केवळ एक जागा जिंकता आली होती.

झोरामथांगांसह मंत्री पराभूत

राज्याचे मुख्यमंत्री मिझो नॅशनल फ्रंटचे सर्वेसर्वा झोरामथांगा यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पक्षाचे बहुमत तर राज्यामध्ये गमावले गेलेच पण दुसरीकडे ऐझवाल पूर्व 1 मतदारसंघातून त्यांना पराभव पत्कारावा लागला आहे. झेडपीएमचे उमेदवार लालथनसंगा यांच्याकडून त्यांना 2101 मतांनी पराभव पत्कारावा लागला. आणखी एका लढतीमध्ये राज्याचे आरोग्यमंत्री आर. लालथांग्लीयाना यांना दक्षिण तुईपूईमधून पराभूत व्हावे लागले आहे. झेडपीएमचे उमेदवार जे. जे. लालपेखलुआ यांनी त्यांना पराभूत केले. राज्याचे आरोग्यमंत्री आर. लालथांग्लीयाना 5333 मते मिळाली तर विजयी झेडपीएमचे उमेदवार जे. जे. लालपेखलुआ यांना 5468 मते मिळाली.

2018 आणि 2023 मधली स्थिती

यापूर्वी म्हणजेच 2018 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिझो नॅशनल फ्रंट पक्षाने 26 जागा मिळविल्या होत्या. यंदा मात्र सत्ताविरोधी लाटेमुळे केवळ 10 जागांवरच पक्षाला यश मिळविता आले आहे. 2018 च्या निवडणुकीत झोराम पीपल्स मुव्हमेंट पक्षाने 8 जागा आणि काँग्रेस पक्षाने 5 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला यावेळेला मात्र केवळ एकाच जागेवर विजय मिळविता आला असून पक्ष नेतृत्वाला याचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने मिझोराममधील प्रचारतंत्र हे दिल्लीतूनच चालविल्याने पक्षाच्या जागा घटल्या असल्याचा आरोप तज्ञांकडून केला जात आहे. झोरामथांगा यांच्या सरकारकाळात झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात आवाज उठविल्याचा फायदा झेडपीएम पक्षाला झाल्याचे पहायला मिळाले. झेडपीएमला तब्बल 27 जागांवर बाजी मारता आली आहे. या निवडणुकीमध्ये यंदा एमएनएफ दुसऱ्या क्रमांकावर व भाजप तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.

अनेक मुद्दे प्रचारात

मिझोराम राज्यामध्ये अनेक प्रश्नांबाबत संघर्ष दिसून आला आहे. या राज्याचा आसाम राज्यासोबतचा सीमातंटा दीर्घकाळ खदखदतो आहे. यासह इतरही मुद्दे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मांडलेले पहायला मिळाले. मुख्यमंत्री झोरामथांगा यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा विरोधकांनी चांगलाच उचलून धरला होता. यात झेपीएम पक्ष आघाडीवर होता. मणिपूरमधून आलेल्या शरणार्थींना आश्रय दिल्याचा मुद्दाही राज्यात प्रचारादरम्यान चांगलाच तापला होता.

ललदुहोमा यांनाच पसंती

निवडणुकीपूर्वीपासूनच सत्ताधारी पक्षाला या खेपेला फटका बसणार अशा प्रकारचा अंदाज मतदानोत्तर विविध संस्थांच्या चाचण्यामध्ये स्पष्ट करण्यात आले होते. त्याप्रमाणेच झेडपीएम पक्षाला सत्ता स्थापन करता येणार असल्याचे दिसून आले आहे. झेडपीएमचे सर्वेसर्वा ललदुहोमा यांची राज्यामध्ये प्रचारात लाट दिसून आली होती आणि यांना जनतेचा प्रतिसादही लाभत होता. जवळपास 40 टक्के लोकांनी त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शविली होती. दर दुसरीकडे सध्याचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांना केवळ 17 टक्के जणांनी पाठिंबा दर्शविला होता.

महत्त्वाच्या लढती

राज्याचे उपमुख्यमंत्री सी. एम. तावन्लुनिया हे झेडपीएमचे उमेदवार डब्ल्यू छुनावामा यांच्याकडून तुईचंग विधानसभा मतदारसंघातून 909 मतांनी पराभूत झाले आहेत. दुसरीकडे ग्रामीण विकासमंत्री लालरुत्खीमा हेसुद्धा ऐझवाल पश्चिम 2 मधून पराभूत झाले आहेत. झेडपीएमचे लालगींग्लोवा हमर यांनी त्यांना 4819 मतांनी पराभूत केले आहे.

ललदुहोमा काय म्हणाले ?

राज्याचे झोराम पीपल्स मुव्हमेंट पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार ललदुहोमा यांनी विजयानंतर माध्यमांना मंगळवारी किंवा बुधवारी आपण राज्यपालांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. याच महिन्यामध्ये नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. 40 विधानसभा मतदारसंघापैकी 27 जागांवर विजय मिळवित झेडपीएमने सत्तेवर येण्याचे स्वप्न साकारले आहे. सरचीप विधानसभा मतदार संघातून विजयी झाल्यानंतर ते म्हणाले, मिझोराम राज्य सध्या आर्थिक संकटाचा सामना करते आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा आपला आटोकाट प्रयत्न असेल. या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी एक सदस्यांची टीमही स्थापली जाणार आहे. निवडणूक पूर्व काळात पक्षाने दिलेली आश्वासने पाळली जाण्यासाठीदेखील प्रयत्न केले जाणार आहेत, असे त्यांनी माध्यमांसमोर मत व्यक्त केले.

ललदुहोमांचा परिचय

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ललदुहोमा यांनी झोराम पीपल्स मुव्हमेंट  पक्षाला बहुमत मिळवून देण्यात मोठे यश प्राप्त केले आहे. युवकांमध्ये यांची लोकप्रियता अधिक असल्याचे मानले जाते. माजी आयपीएस अधिकारी असणाऱ्या ललदुहोमा हे एकेकाळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुरक्षाप्रमुख होते. ही नोकरी सोडून काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश मिळवला. 1984 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर ते लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. 2018 च्या निवडणुकीत ते ऐझवाल पश्चिम 1 आणि सरचिप या मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत सरचिप मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. 2018 पासून ते झोराम पीपल्स मुव्हमेंट या पक्षाच्या नात्याने निवडणूक लढवित आहेत. ते सध्याला 74 वर्षाचे असून त्यांच्या पक्षाचे उमेदवार 50 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत.

दोनच संस्थांचे अंदाज खरे

मतदानोत्तर चाचण्यांमध्ये ठराविक संस्थांचे अंदाज खरे ठरले आहेत. जवळपास 5 संस्थांनी विधानसभा निवडणुकीतील पक्षांच्या विजयाबाबतचे अंदाज वर्तविले होते. यामध्ये ‘इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया’ आणि ‘जन की बात’ या दोन संस्थांनी अंदाज योग्य वर्तविला होता. ‘इंडिया टुडे’ने झेडपीएमला 28 ते 35 जागा मिळतील असे म्हटले होते तर ‘जन की बात’ने 15 ते 25 जागा मिळतील असे म्हटले होते. ‘टाईम्स नाऊ, एबीपी न्यूज, इंडिया टीव्ही’ आणि ‘रिपब्लिक टीव्ही’ यांचे अंदाज मात्र फसले आहेत.

Advertisement
Tags :

.