हसणे अनिवार्य असणारा देश
‘हसणे’ हा केवळ मानव नामक सजीवाचा गुणधर्म आहे. हसण्याच्या क्रियेचे महत्वही मोठे आहे. हसतमुख माणसे सर्वांना आवडतात. इतकेच नव्हे. तर कित्येक शारिरीक व्याधी हसण्याने कमी होतात किंवा दूर होतात, असा अनुभव असतो. त्यामुळे कित्येक शहरांमध्ये ‘हास्य क्लब’ स्थापन करण्यात आले आहेत. मात्र, हास्य ही एक नैसर्गिक क्रिया असते. तिची सक्ती करता येत नाही, असे मानले जाते. तथापि, जपान हा एक देश असा आहे, की ज्या देशाच्या एका प्रांतात प्रत्येक नागरीकासाठी दिवसातून किमान एकदा हसणे अनिवार्य आहे.
या प्रांताचे नाव आहे यामागाटा. याप्रांताच्या प्रतिनिधी गृहाने एक कायदा केला असून त्यानुसार प्रत्येक नागरीकाने दिवसातून किमान एकदा हसणे अनिवार्य करण्यात आले आहे. असा विचित्र कायदा असणारा हा जगातील एकमेव प्रदेश आहे. हसण्याच्या क्रियेचे शारिरीक आणि मानसिक लाभ लक्षात घेऊन हा कायदा करण्यात आल्याचे बोलले जाते. हसण्याचे आपल्या शरिरावर चांगले परिणाम होतात, असे याच प्रांतातील एका विद्यापीठाच्या संशोधनातून आढळून आले आहे. त्यामुळे या प्रांतात असा कायदा करण्यात आला असून तो लागू झाला आहे.
मात्र, समजा हा कायदा कोणी मोडला तर त्याला कोणतीही शिक्षा केली जात नाही. केवळ लोकांचे हासण्याच्या लाभाच्या संदर्भात प्रबोधन व्हावे, म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे यामागाटा प्रांताच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हा कायदा कोणी मोडला तर अशी व्यक्ती शोधणेही अशक्य आहे. कारण प्रशासन कितीही सक्षम असले तरी ते सर्व लोकांवर लक्ष ठेवू शकत नाही. येथील विरोधी पक्षांनी मात्र, या कायद्यावर टीका केली असून हा प्रकारच हस्यास्पद ठरविला आहे.