कारवार मतदारसंघातील मतमोजणी कुमठा येथील डॉ. बाळीगा महाविद्यालयात
मतमोजणी17 फेऱ्यांमध्ये : जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांची माहिती
कारवार : चार जून रोजी कुमठा येथील डॉ. ए. व्ही. बाळीगा कला आणि विज्ञान महाविद्यालयात होणाऱ्या कारवार लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांनी दिली.कारवार लोकसभा मतदारसंघात मतदान 7 मे रोजी झाले आहे. या मतदारसंघात 76.39 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. यापूर्वी कॅनरा लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारवार लोकसभा मतदार संघातून एकूण 13 उमेदवार आपले नशीब आजमावीत आहेत. यामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पाच आणि अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. निवडणुकीच्या रिंगणात 13 उमेदवार उतरले आहेत, हे खरे असले तरी चुरशीची लढत काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर आणि भाजपचे विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्यात होत आहे. म. ए. समितीचे उमेदवार निरंजन देसाई पहिल्यांदाच लोकसभा मतदार संघातून लढत आहेत. याशिवाय कारवार लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच निंबाळकर,सरदेसाई यांच्यासह खानापूर तालुक्यातील पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
दुपारी 12 पर्यंत निकाल स्पष्ट
जिल्हाधिकारी मानकर पुढे म्हणाल्या, कारवार लोकसभा मतदार संघात कारवार जिल्ह्यातील सहा (कारवार, कुमठा, भटकळ, शिरसी, हल्याळ आणि यल्लापूर) व बेळगाव जिल्ह्यातील दोन (खानापूर आणि कित्तूर) अशा एकूण आठ विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक खोलीत 14 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. पहिल्यांदा पोस्टल बॅलेटची मतमोजणी होणार आहे. दुपारी 12 वाजता मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे, असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, खानापूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी 23 फेऱ्यांमध्ये, कित्तूर 17, हल्याळ 16, कारवार 19, कुमठा 16, भटकळ 18, शिरसी 19 आणि यल्लापूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी 17 फेऱ्यांमध्ये होणार आहे. मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापूर्वीच दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणीसाठी 112 मतमोजणी सुपरवायझर, 112 मतमोजणी सहाय्यक आणि 112 मायक्रो ऑब्झर्व्हरची नियुक्ती केली आहे. पोस्टल मतपत्रीका मोजणीसाठी स्वतंत्र खोली आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मतमोजणी केंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी घातली असून उमेदवार आणि त्यांच्या एजंटसाठी 304 पास देण्यात आले आहेत.