भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा इशारा : गदग येथे इमारतीचे उद्घाटन
बेंगळूर : राज्यात भ्रष्टाचाराची काही प्रकरणे असतील तर ते बघून शांत बसणार नाहीत. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. रविवारी गदग शहरातील मुलींच्या बालमंदिर इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. केएसआरटीसीच्या अनेक बसेस नादुरुस्त झाल्या असून चालकांना ड्यूटी मिळत नाही. ड्यूटी लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी पैसे मागितल्याचा आरोप चालकांनीच केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना, आम्ही भाजप सरकारच्या 40 टक्के भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करत आहोत. आरोप सिद्ध झाल्यास दोषींवर कारवाई केली जाईल. ड्यूटी लावण्यासाठी लाच मागितल्याच्या प्रकरणाचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कांतराजू यांच्या अहवालाबाबत बोलताना, अद्याप अहवाल सादर झालेला नसल्याने तो कसा स्वीकारता येईल. अहवाल दिल्यानंतर स्वीकृतीचा प्रश्न निर्माण होतो. कायमस्वरुपी मागासवर्ग आयोगाने अहवाल दिलेला नाही. अहवाल देण्यात आल्यानंतर आपण विचार करतो. काही लोक हा अहवाल वैज्ञानिक नसल्याचा विचार करत आहेत. अहवाल न मिळाल्याने आणि त्यात काय आहे हे न समजता ते अनुमानाच्या आधारे निर्णय घेत आहेत. मागील सरकारने नोव्हेंबर अखेरपर्यंत विकासावर 70 हजार 814 कोटी ऊपये खर्च केले होते. आमच्या सरकारने 73,928 कोटी ऊपये खर्च केले आहेत. पैसे खर्च झाले नाहीत, असे होत असलेले आरोप हे खोटे आहेत, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले.