For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नगरसेविका ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

07:00 AM Jul 22, 2022 IST | Tarun Bharat Portal
नगरसेविका ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Ranchi, July 04 (ANI): NDA's Presidential candidate Droupadi Murmu along with former Jharkhand Chief Minister Raghubar Das arrives to attend the BJP legislative party meeting, in Ranchi on Monday. (ANI Photo)
Advertisement

संघर्षपूर्ण कारकिर्दीचा यथोचित गौरव : आप्तांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून सावरणाऱया मुर्मू

Advertisement

ओडिशातील पहाडपूर गाव हे आता राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहे. या गावाच्या  प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला बॅनर लावण्यात आले असून त्यावर द्रौपदी मुर्मू यांची मोठमोठी छायाचित्रे झळकली आहेत. ‘राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचे पहाडपूर गाव स्वागत करते’ असे यावर नमूद आहे. येथून काही अंतरावर एका घरात 42 वर्षांपूर्वी द्रौपदी मुर्मू विवाह करून आल्या होत्या. तेव्हा पक्क्या भिंती नव्हत्या तसेच पक्के छतही नव्हते.

4 वर्षांमध्ये या घराने 3 शोकांतिका पाहिल्या. या घरातील 3 जणांचा अकाली मृत्यू झाला. 2010-14 दरम्यान द्रौपदी मुर्मू यांच्या 2 मुलांचा आणि पतीचा मृत्यू झाला. मोठय़ा मुलाचा मृत्यू रहस्यमय पद्धतीने झाला होता. 2 वर्षांनी छोटय़ा मुलाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी विद्यार्थ्यांसाठी घरताच वसतीगृह तयार केले होते. मोठय़ा मुलाचा मृत्यू झाला तेव्हा द्रौपदी मुर्मू या 6 महिन्यांपर्यंत नैराश्यातून बाहेर पडू शकल्या नव्हत्या. तेव्हा त्यांनी अध्यात्माची मदत घेतली, बहुधा अध्यात्मानेच त्यांना डोंगराएवढे दुःख सहन करण्याची शक्ती दिली असावी असे त्यांच्या नातेवाईक शाक्यमुनि यांनी म्हटले.

Advertisement

ध्यानधारणेचा मार्ग

मोठय़ा मुलाच्या मृत्यूनंतर द्रौपदी मुर्मू या हादरून गेल्या होत्या. रायरंगपूर ब्रह्मकुमारी संस्थेच्या प्रमुख सुप्रिया यांच्या सुचनेनुसार त्या केंद्रात जाऊ लागल्या. मुर्मू या कायम वेळेत तेथे पोहोचायच्या. 2014 पर्यंत त्या तेथे यायच्या. राज्यपाल झाल्यावर त्यांना एक किंवा दोनवेळाच येता आले, परंतु त्यांची ध्यानधारणा कधीच थांबली नाही. द्रौपदी मुर्मू या स्वतःसोबत नेहमी एक ट्रान्सलाइट आणि शिवबाबांची एक छोटी पुस्तिका बाळगतात. अन्य कुठे गेल्यास ध्यानधारणेचा नित्यक्रम त्या चुकवत नाहीत. राष्ट्रपती झाल्यावरही त्या हा नित्यक्रम कायम ठेवतील अशी अपेक्षा असल्याचे सुप्रिया यांनी म्हटले आहे.

पहाटे लवकरच उठतात

द्रौपदी मुर्मू कितीही व्यग्र असल्या तरीही ध्यान, सकाळचा फेरफटका आणि योग कधीच चुकवत नाहीत. दररोज पहाटे 3.30 वाजता त्या उठतात असे त्यांच्या गावातील सुनीता मांझी या महिलेने सांगितले. मुर्मू राज्यपाल असताना झारखंड राजभवनाचे दरवाजे सर्वांसाठी खुले असायचे. कुणीही भेटण्यासाठी वेळ मागितली तर त्याला होकार मिळायचा.

राज्यपाल म्हणून प्रभावी

द्रौपदी मुर्मु या  दृढनिश्चयी आणि सत्यासोबत ठामपणे उभ्या राहणाऱया आहेत. 2017 मध्ये मुर्मू या झारखंडच्या राज्यपाल असताना भाजप सरकारने सीएनटी-एसपीटी दुरुस्ती विधेयक आणले होते. तेव्हा मुर्मू यांना हे विधेयक परत पाठविले होते. त्यांनी आदिवासी समुदायाच्या हितांना धक्का पोहोचविणारे हे विधेयक असल्याचे म्हटले होते.

स्थानिक भाजप शाखेने 20 हजार लाडू तयार करत मुर्मू यांना शुभेच्छा देण्याठी 100 बॅनर झळकविले आहे. महिला काय करू शकतात हे द्रौपदी मुर्मू यांनी सिद्ध करून दाखविले आहे. त्यांनी आयुष्यभर मोठा संघर्ष केला. अथक संघर्षाचे फळ म्हणून त्या राष्ट्रपतिपदापर्यंत पोहोचल्या आहेत असे उद्गार त्यांच्या नातेवाईक सरस्वती मुर्मू यांनी काढले आहेत.

विजय मिरवणूक अन् आदिवासी नृत्य

रालोआ उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर मोठय़ा प्रमाणावर जल्लोष करण्याची तयारी त्यांच्या रायरंगपूर येथे करण्यात आली आहे. जिल्हय़ात अनेक ठिकाणी सामूहिक स्वरुपात मिठाई तयार करण्यात आली असून त्यांच्या गावासह अनेक गावातील लोकांनी विजय मिरवणूक काढत आदिवासी नृत्याचा आनंद घेतला आहे.

राष्ट्रपतींना मिळतात अनेक सुविधा...

भारतात राष्ट्रपतिपद हे सर्वोच्च असते. तसेच राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देत असतात. राष्ट्रपती तिन्ही संरक्षण दलांचे सर्वोच्च कमांडर असतात. तसेच त्यांच्या मंजुरीशिवाय कुठलाही कायदा संमत होऊ शकत नाही. देशाला आता 15 वे राष्ट्रपती मिळणार असून राष्ट्रपतींना किती वेतन आणि कुठल्या सुविधा मिळतात हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भारताचे राष्ट्रपती दिल्लीतील राष्ट्रपती भवनात वास्तव्य करतात. हे जगातील कुठल्याही शासनप्रमुखाच्या निवासस्थानापेक्षा मोठे आहे. राष्ट्रपतींना 5 लाख रुपये वेतन दर महिन्याला मिळते. राष्ट्रपतींचे वेतन 1951 च्या अधिनियमाद्वारे निर्धारित केले जाते. मासिक वेतनासह राष्ट्रपतींना अनेक प्रकारचे भत्ते देखील मिळतात.

320 एकरमध्ये फैलावलेल्या राष्ट्रपती भवनाची निर्मिती 1929 मध्ये पूर्ण झाली होती. याच्या मुख्य इमारतीत 340 खोल्या आहेत. यात राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान, स्वागतकक्ष, अतिथी कक्ष आणि कार्यालय सामील आहे.

राष्ट्रपती भवनात उद्यान, मोकळी जागा, अंगरक्षक आणि कर्मचाऱयांसाठी वास्तव्यसुविधा, अन्य कार्यालयांचाही समावेश आहे. राष्ट्रपती भवनाचे काही हिस्से म्हणजेच म्युझियम (संग्रहालय), मुघल गार्डन इत्यादींमध्ये लोक निवडक दिवसांमध्ये नोंदणी करवून फेरफटका मारू शकतात.

भारताच्या राष्ट्रपतींसाठी दोन व्हेकेशन रिट्रीट उपलब्ध आहेत. उत्तर भारतात शिमला येथील मशोबरामध्ये द रिट्रीट बिल्डिंग आहे. मशोबरा पर्वतीय भागात असलेल्या मोहक स्थळी राष्ट्रपती वर्षात किमान एकदा भेट देत असतात.

तर हैदराबादच्या बोलारममध्ये राष्ट्रपती निलयममध्ये व्हेकेशन रिट्रीट आहे. 1860 मध्ये निर्मित या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ 90 एकर इतके आहे. एक मजली इमारतीत 11 खोल्या आहेत. राष्ट्रपती वर्षात किमान एकदा निलयम येथे जातात.

कार्यकाळ संपल्यावर राष्ट्रपतींना अनेक लाभ मिळत असतात. यात 1.5 लाख रुपये दर महिन्याला पेन्शन, सुसज्ज बंगला, मोफत रेल्वे किंवा हवाईप्रवास यासारख्या सुविधा सामील आहेत.

राष्ट्रपती-घटनात्मक प्रमुख...

पंतप्रधानांच्या नियुक्तीसह अनेक अधिकार

भारतात राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख पद आहे. म्हणजेच हे पद भूषविणारा व्यक्ती देशाच्या सर्वोच्चपदी असतो. राष्ट्रपती हे कार्यपालिकेचे प्रमुख असतात आणि त्यांच्या आदेशानुसार कार्यपालिका कार्य करत असते. कार्यपालिका म्हणजे देशात निवडून आलेले सरकार असते.

भारतात संसदीय प्रणाली

भारतात संसदीय प्रणाली असून येथील कार्यपालिका म्हणजेच सरकार संसदेला उत्तरदायी आहे. देशात जनतेचे प्रतिनिधी निवडले जातात. घटनात्मक दृष्टय़ा राष्ट्रपती हे सरकारचे प्रमुख असतात. परंतु राष्ट्रपती हे शासनसंबंधी सर्व कार्ये पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार करत असतात.

घटनेतील कलम 74 (1) मधील व्यवस्थेनुसार राष्ट्रपतींच्या सहाय्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल, ज्याचा प्रमुख पंतप्रधान असणार आहे आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच राष्ट्रपती सर्व कार्ये पार पाडणार आहेत. म्हणजेच घटनात्मक दृष्टय़ा राष्ट्रपती देशाचे प्रमुख असले तरीही त्याचे अधिकार पंतप्रधानांकडे असतात.

राष्ट्रपतींचे प्रमुख अधिकार

भारतात राष्ट्रपती एक प्रतिष्ठा आणि सन्मानाने परिपूर्ण पदद आहे. कार्यपालिकेचे सर्व अधिकार पंतप्रधानांकडे असले तरीही अनेकदा पंतप्रधानांच्या नियुक्तीवेळी आणि कुठल्याही पक्षाला बहुमत प्राप्त नसल्यास राष्ट्रपतींची भूमिका महत्त्वाची ठरत असते. आतापर्यंत देशात जर एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास राष्ट्रपती सर्वात मोठय़ा पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करत असतात. यासंबंधी राष्ट्रपती स्वतःच्या विवेकबुद्धीने निर्णय घेऊ शकतात. कुठल्या पक्षाचे सरकार अधिक स्थिर असेल आणि कुणाला संधी द्यावी याचा निर्णय राष्ट्रपतीच घेत असतात.

व्ही.पी. सिंह हे 1989 मध्ये पंतप्रधान झाले होते, तेव्हा काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तत्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांनी प्रथम काँगेसला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले होते. परंतु काँग्रेसला सरकार स्थापन करण्यास अपयश आल्यावर व्ही.पी. सिंह यांना आमंत्रित करण्यात आले होते.

आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार

राष्ट्रपतींकडे देशात आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे. राष्ट्रपती तीन स्थितींमध्ये आणीबाणीची घोषणा करू शकतात. राष्ट्रीय आणीबाणी अंतर्गत 1975 मध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती. तर राज्यांमध्ये सरकार अपयशी ठरल्यास तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. याचबरोबर आर्थिक आणीबाणी लागू करण्याचा अधिकार राष्ट्रपतींकडे आहे. परंतु आर्थिक आणीबाणी देशात आतापर्यंत कधीच लागू करण्यात आलेली नाही.

राष्ट्रपतींचे प्रमुख अधिकार

राष्ट्रपतींचे मूळ कर्तव्य कार्यकारी शक्तींचे निर्वहन करणे आहे.  पंतप्रधानांच्या नियुक्तीसह संरक्षण दलांच्या प्रमुखांची नियुक्तीही राष्ट्रपतींकडूनच होत असते. याचबरोबर राष्ट्रपतींकडे घटनेच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. या जबाबदारींप्रकरणी राष्ट्रपती अनेकदा स्वतःच्या विवेकबुद्धीद्वारे निर्णय घेत असतात. कुठलेही विधेयक त्यांच्या मंजुरीशिवाय संमत होऊ शकत नाही. वित्त विधेयक वगळता कुठलेही विधेयक ते पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात.

मुर्मू यांच्यामुळे 5 विक्रम नोंदले जाणार

देशाचा आगामी राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू लवकरच शपथ घेणार आहेत. देशाच्या 31 मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानानंतर मतपत्रिकांची मोजणी संसद भवन परिसरात पार पडली आहे. या निवडणुकीत रालोआ उमेदवार द्रौपदी मुर्मू या विजयी झाल्या आहेत. मुर्मू या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरणार आहेत. याचबरोबर 5 विक्रम त्यांच्या नावावर नोंदले जाणार आहेत.

देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर पोहोचणाऱया त्या पहिल्या आदिवासी महिला नेत्या ठरतील. मुर्मू यांचा जन्म ओडिशाच्या मयूरभंज जिल्हय़ात संथाल समुदायाच्या गरीब आदिवासी कुटुंबात झाला होता. देशात आतापर्यंत अद्याप आदिवासी समुदायाचा सदस्य पंतप्रधान तसेच राष्ट्रपती झालेला नाही. परंतु देशाला के.आर. नारायणन आणि रामनाथ कोविंद यांच्या स्वरुपात दोन दलित राष्ट्रपती मिळाले आहेत.

द्रौपदी मुर्मू या देशाच्या अशा पहिल्या राष्ट्रपती ठरणार आहेत, ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर देशात झाला आहे. 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या सुमारे 11 वर्षांनी द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी झाला. देशाला आतापर्यंत मिळालेले सर्व राष्ट्रपती हे 1947 पूर्वी जन्मलेले होते. मुर्मू राष्ट्रपती झाल्याने देशात राष्ट्रपती आणि पंतप्रधान पद स्वतंत्र भारतात जन्मलेले व्यक्ती भूषविण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

सर्वात कमी वयाचे राष्ट्रपती ठरण्याचा मानही मुर्मू यांना मिळणार आहे. देशात सर्वात कमी वयात राष्ट्रपती होण्याचा विक्रम नीलम संजीव रेड्डी यांच्या नावावर आहे. 1977 मध्ये संजीव रेड्डी हे बिनविरोध राष्ट्रपती म्हणून निवडून आले होते.  राष्ट्रपती पद स्वीकारताना रेड्डी यांचे वय 64 वर्षे 2 महिने आणि 6 दिवस इतके होते. तर 20 जून 1958 मध्ये जन्मलेल्या द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती पद स्वीकारताना 64 वर्षे एक महिना आणि 8 दिवस इतक्या वयाच्या असणार आहेत.

पहिल्यांदाच नगरसेविका राहिलेली व्यक्ती भारतात राष्ट्रपतिपदापर्यंत पोहोचणार आहे. मुर्मू यांनी 1997 मध्ये रायरंगपूर नगरपालिकेत नगरसेविका होत स्वतःच्या राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली होती. त्यानंतर 3 वर्षांनी त्या पहिल्यांदा आमदार झाल्या होत्या. त्यांनी ओडिशाच्या बिजद-भाजप सरकारमध्ये दोनवेळा मंत्रिपदही सांभाळले आहे. द्रौपदी मुर्मू या देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचणाऱया ओडिशातील पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत.

द्रौपदी मुर्मू यांनी भाजपमध्ये सामील होत राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली होती. त्या नेहमीच भाजपमध्ये सक्रीय राहिल्या. 1997 मध्ये मुर्मू भाजपच्या ओडिशातील अनुसूचित जमाती मोर्चाच्या उपाध्यक्ष झाल्या होत्या. 2002-09 पर्यंत आणि मग 2013 मध्ये मयूरभंज भाजप जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. तर भाजपच्या एसटी मोर्चामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

झारखंडच्य राज्यपालपद भूषविणाऱया मुर्मू या पहिल्या महिला होत्या. तर 2015 ते 2021 पर्यंत त्या राज्यपाल म्हणून कार्यरत होत्या. भारतात कुठल्याही राज्यात राज्यपाल म्हणून नियुक्त केलेल्या तसेच कार्यकाळ पूर्ण केलेल्या त्या पहिल्या उडिया महिला तसेच आदिवासी नेत्या होत्या.

भव्य अन् दिव्य...

रायसीना हिल्स येथील राष्ट्रपती भवन हे देशातील सर्वोत्तम इमारतींपैकी एक आहे. देशाची राजधानी दिल्लीत असलेले राष्ट्रपती भवन बाहेरून जितके सुंदर दिसते, तितकेच ते आतमध्ये भव्य आहे. राष्ट्रपती भवन पाहण्यास भव्य आणि सुंदर असण्यासह त्याची अनेक वैशिष्टय़े आहेत. राष्ट्रपती भवन जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीतील राष्ट्रपतींचे निवासस्थान आहे. पूर्वी हे ब्रिटिश व्हाइसरॉय यांचे निवासस्थान होते. 1911 मध्ये भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीत स्थलांतरित करताना याची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हा या आलिशान भवनाच्या निर्मितीकरता 17 वर्षे लागली होती. याची निर्मिती 1912 मध्ये सुरू होत 1929 मध्ये पूर्ण झाली होती. 26 जानेवारी 1950 रोजी या वास्तूला जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीची स्थायी संस्था म्हणून बदलण्यात आले होते.

मुघल गार्डन आकर्षणाचे केंद्र

राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन पर्यटकांसाठी आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. 15 एकरमध्ये फैलावलेल्या या गार्डनमध्ये ब्रिटिश आणि मुघल दोघांच्या उद्यानांची झलक दिसून येते. या गार्डनच्या निर्मितीसाठी एडविन लुटियन्स यांनी काश्मीरमधील मुघल गार्डन, जन्नत बागेसह भारत तसेच प्राचीन इरानच्या मध्यकाळादरम्यान तयार करण्यात आलेल्या राजांच्या बाग-बगीचांचे देखील अध्ययन केले होते. येथे रोपांची लागवड करण्याचे काम 1928 मध्ये सुरू होत एक वर्षापर्यंत चालले होते. येथील फुलांना राजाराम मोहन रॉय, जवाहरलाल नेहरू, मदर तेरेसा, क्वीन एलिझाबेथ, अब्राहम लिंकन, जॉन एफ केनेडी यांच्यासह महाभारतातील अर्जुन, भीम यांच्यासह अन्य महान पात्रांची नावे देण्यात आली आहेत.

राष्ट्रपती भवनात 340 कक्ष

राष्ट्रपती भवनाची निर्मिती वास्तुकार एडविन लँडसीयर लुटियन्स यांनी केली होती. चारमजली राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती कार्यालय, अतिथी कक्ष, कर्मचारी कक्षासह एकूण 340 कक्ष आहेत. याचबरोबर दरबार हॉल, ड्रॉइंग रुम देखील आहे. नॉर्थ ड्रॉइंग रुममध्ये राष्ट्रपती हे अन्य देशांच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेत असतात. तर बँक्वेट हॉलमध्ये माजी राष्ट्रपतींच्या तसविरी लावलेल्या आहेत. राष्ट्रपती भवन तयार करण्यासाठी सुमारे 45 लाख विटांचा वापर झाला होता. राष्ट्रपती भवनात इमारतीसह मुघल गार्डन आणि कर्मचाऱयांसाठी निवासस्थानेही आहेत. भवन तयार करण्यासाठी सुमारे 29 हजार लोकांनी काम केले होते. या आलिशान भवनाच्या निर्मितीकरता 17 वर्षे लागली होती. भारताचे राष्ट्रपती भवन हे जगातील सर्वात मोठय़ा सरकारी भवनांपैकी एक आहे. राष्ट्रपती भवनाचा मुख्य गुबंद सांचीच्या बौद्ध स्तुपासारखा आहे. हा गुबंद राष्ट्रपती भवनाला अधिक आकर्षक स्वरुप प्राप्त करून देतो.

दरबार हॉल विशेष

राष्ट्रपती भवनाचा दरबार हॉल विशेष असून तो नेहमीच चर्चेत राहतो. या हॉलचा वापर राजकीय समारंभ, पुरस्कार वितरण यासाठी केला जातो. इंग्रजांच्या राजवटीत दरबार हॉलला सिंहासन कक्ष म्हटले जात होते. यात दोन सिंहासने व्हाइसरॉय आणि त्यांच्या पत्नीसाठी असायची. आता यात केवळ एक आसन अन् तेही राष्ट्रपतींसाठी असते. तेथेच 5 व्या शतकातील गुप्तकाळाशी निगडित आशीर्वाद देणाऱया मुद्रेतील गौतम बुद्ध यांची मूर्ती आहे. या  हॉलचे वैशिष्टय़ म्हणजे राष्ट्रपतींच्या आसनाच्या थेट समोर राजपथाच्या पलिकडील इंडिया गेट आहे.

सर्वात मोठे विजय...

राजेंद्र प्रसाद

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सर्वात मोठा विजय मिळवण्याचा विक्रम देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या नावावर आहे. त्यांना 1957 मध्ये दुसऱयांदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संधी देण्यात आली होती. त्यांना या निवडणुकीत चौधरी हरिराम आणि नागेंद्र नारायण दास यांचे आव्हान होते. या निवडणुकीत राजेंद्रप्रसाद यांना एकतर्फी लढतीत 4,59,698 मते मिळाली. तर चौधरी हरिराम यांना 2,672 आणि नागेंद्र दास यांना 2,000 मते मिळाली.

सर्वपल्ली राधाकृष्णन...

राजेंद्र प्रसाद यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर, 1962 मध्ये भारताची तिसरी राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसने उपाध्यक्ष सर्वपल्ली राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली. त्यांना 5,53,067 मते मिळाली, तर चौधरी हरिराम यांना सहा हजारांहून अधिक मते मिळाली. तिसरे उमेदवार यमुना प्रसाद त्रिसुलिया यांना 3,537 मते मिळाली. सर्वात मोठय़ा विजयांच्या बाबतीत हा मोठा विक्रम आहे.

के. आर. नारायणन

राष्ट्रपतीपदाची 1997 ची निवडणूक ही इतिहासातील सर्वात एकतर्फी निवडणूक ठरली . वास्तविक, या निवडणुकीत संयुक्त आघाडी सरकार आणि काँग्रेसकडून के. आर. नारायणन यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर विरोधी पक्षात बसलेल्या भाजपनेही नारायणन यांना पाठिंबा जाहीर केला. गंमत म्हणजे या निवडणुकीत टी. एन. शेषन यांनी निवडणूक आयोगात सुधारणा करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नारायणन यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. यात के. आर. नारायणन यांना 9,56,290 मते मिळाली, तर शेषन यांना केवळ 50,361 मते मिळाली आणि त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले. या निवडणुकीत शेषन यांना फक्त शिवसेना आणि काही अपक्षांचा पाठिंबा मिळाला होता.

एपीजे अब्दुल कलाम

भाजपने या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एपीजे अब्दुल कलाम यांना उमेदवारी जाहीर करत मोठा विजय मिळवला. किंबहुना माजी शास्त्रज्ञ आणि मुस्लीम उमेदवार राष्ट्रपतीपदासाठी भाजपने विरोधकांना संभ्रमात टाकले. अखेर काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्षांनी कलाम यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निवडणुकीतही डाव्या पक्षांनी कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांना उमेदवारी दिली. असे असूनही, हा इतिहासातील सर्वात एकतर्फी सामना होता. अब्दुल कलाम यांना 10,30,250 मतांपैकी 9,22,884 मते मिळाली, तर सेहगल यांना केवळ 1,07,366 मते मिळाली.

कमी फरकाचे विजय...

व्ही. व्ही. गिरी - नीलम संजीव रेड्डी

स्वतंत्र भारतातील सर्वात वादग्रस्त निवडणुकांपैकी एक 1969 ची राष्ट्रपती निवडणूक सर्वात कमी फरकाने विजय मिळविणारी ठरली. या निवडणुकीवेळी काँग्रेसमध्ये पक्षावरून दोन गटात युद्ध सुरू होते. यातील एका गटाला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पाठिंबा होता, तर दुसरा गट पक्ष संघटनेतील ज्ये÷ नेत्यांचा म्हणजे ‘सिंडिकेट’चा होता. काँग्रेस संघटनेने नीलम संजीव रेड्डी यांना उमेदवार म्हणून घोषित केले. इंदिरा गांधींनी मतदानाआधीच व्ही. व्ही. गिरी यांना पाठिंबा दिला होता. व्ही. व्ही. गिरी यांना 4,01,515 मते मिळाली, तर नीलम संजीव रेड्डी यांना केवळ 3,13,548 मते मिळाली. या निवडणुकीत अन्य उमेदवार सी. डी. देशमुख यांना 1,12,769 मते मिळाली. म्हणजेच नीलम संजीव रेड्डी यांचा निकराच्या सामन्यात पराभव झाला. या निवडणुकीसाठी आणखी 12 उमेदवार रिंगणात होते.

डॉ. झाकीर हुसेन - कोका सुब्बाराव

भारताच्या इतिहासातील चौथी राष्ट्रपतीपदाची निवडणूकही अगदी कमी फरकाने विजयी होणारी ठरली. झाकीर हुसेन यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. 1967 मध्येच निवृत्त झालेले सरन्यायाधीश कोका सुब्बाराव यांना विरोधकांनी या निवडणुकीत उमेदवारी दिली. मात्र, या निवडणुकीत हे दोनच उमेदवार नव्हते, तर एकूण 17 जण उभे होते. यात झाकीर हुसेन 4,71,244 मते मिळवत विजयी झाले. सुब्बाराव यांना 3,63,971 मते मिळाली. दुसरीकडे, या निवडणुकीत 17 पैकी नऊ उमेदवार आपले खातेही उघडू शकले नाहीत. एकही मत न मिळालेल्यांमध्ये चौधरी हरिराम यांच्या नावाचाही समावेश होता.

Advertisement
Tags :

.