नगरसेवक चौकशी प्रकरण अडकले पोलीस स्थानकांच्या हद्दीच्या वादात
शहापूर पोलिसांकडून टिळकवाडी पोलिसांकडे बोट : तक्रारदार आंदोलनाच्या पवित्र्यात
बेळगाव : महानगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याने नगरसेवक आणि काही अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे. मात्र, पोलीस स्थानकांच्या हद्दीच्या वादात तक्रार अडकली आहे. यामुळे एफआयआर दाखल करून घेण्यासह संबंधितांची चौकशी होत नसल्याने तक्रारदार कर्मचारी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. यापूर्वी गोवावेस येथील महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयात प्रभारी महसूल निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने सत्ताधारी गटातील नगरसेवकासह काही अधिकाऱ्यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार दिली आहे. महापालिका आयुक्तांसह सीआरसी विभागाकडे तक्रार दिल्याने याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची सूचना शहापूर पोलिसांना देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार पोलिसांनी तक्रारदार आणि नगरसेवकांना एक दिवस पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी तक्रारदाराला पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. मात्र, गोवावेस कॉम्प्लेक्स आपल्या हद्दीत येत नसून टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने सदर प्रकरण टिळकवाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येत असल्याचे तक्रारदाराला सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरापर्यंत तक्रारदार शहापूर पोलीस स्थानकात हजर होता. गुन्हा कुठेही घडो एखादा तक्रारदार पोलीस ठाण्यात गेल्यास त्याची तातडीने नोंद करून घेऊन त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग करणे जऊरीचे आहे. मात्र, शहापूर पोलिसांनी चौकशी व गुन्हा दाखल करण्याआधीच हे प्रकरण आपल्या हद्दीत येत नसल्याचे सांगत टिळकवाडी पोलिसांकडे बोट दाखविले आहे. त्यामुळे राजकीय दबावापोटी पोलीस कातडी बचाव भूमिका घेत असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आपल्याला योग्य न्याय न दिल्यास महानगरपालिका तसेच पोलीस ठाण्यांसमोर आंदोलन करण्याचा पवित्रा तक्रारदार कर्मचाऱ्यांने घेतला आहे.
पोलीस आयुक्तांकडून कानउघाडणी?
सीआरसी विभागाकडून शहापूर पोलीस ठाण्याकडे मनपा कर्मचाऱ्याची तक्रार आल्यानंतर त्या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करून घेण्याबाबत पोलीस आयुक्तांनी शहापूरच्या पोलीस निरीक्षकांची कानउघाडणी केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मात्र, तरीदेखील हे प्रकरण शहापूर पोलिसांनी टिळकवाडी पोलिसांकडे वर्ग करण्याची तयारी केल्याने पोलीस आणि महापालिका वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.