कार्पोरेट, तरुण भारत-बेळगाव, म्हापसा, सावंतवाडी संघ उपांत्य फेरीत
लोकमान्य चषक प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी/बेळगाव
लोकमान्य को-ऑप. सोसायटी आयोजित लोकमान्य प्रिमीयर लीग आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी कार्पोरेटने बेळगावचा, सावंतवाडीने पुणेचा, तरुण भारत बेळगावने गोवा तरुणा भारतचा, कार्पोरेटने कोल्हापूरचा तर म्हापसाने मुंबईचा पराभव करुन यांनी विजय मिळविले. बेळगाव तरुण भारत, कार्पोरेट, सावंतवाडी व म्हापसा संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. जोतिबा दुनदुनी, सुहास रावळ, वैभव परब, गणेश कंग्राळकर, मयुरवीर यांना ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला.
एसकेई प्लॅटिनम ज्युबिली मैदानावर खेळविण्यात आलेल्या शुक्रवारच्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात बेळगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 45 धावा केल्या. त्यात विनोद नार्वेकरने 16 तर भाऊ कुऱ्हाडेने 10 धावा केल्या. कार्पोरेटतर्फे जोतिबा दुनदुनी 14 धावांत 2 तर सागर पाटील, अरविंद माने, विशाल सावंत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना कार्पोरेट संघाने 6.5 षटकात 3 गडी बाद 46 धावा करुन सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात संदीप किणेकर व राहुल पाटील यांनी प्रत्येकी 12 तर अमर खनगावकरने 10 धावा केल्या. बेळगावतर्फे भाऊ कुऱ्हाडेने 16 धावांत 2 तर महेश गावडेने 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात सावंतवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 3 गडी बाद 108 धावा केल्या. त्यात वैभव परबने 4 षटकार, 7 चौकारासह 23 चेंडूत 60 धावा जलद अर्धशतक झळकविले. त्याला मयुर पिंगुलकरने 2 षटकार, 2 चौकारांसह 33 धावा केल्या. पुणेतर्फे शौनक कुलकर्णीने 15 धावांत 2 तर आदित्य परांजपेने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना पुणे संघाचा डाव 7.3 षटकात 55 धावांत आटोपला. त्यात शुभम मोरेने 2 षटकार 1 चौकारासह 16, प्रतिक निकमने 2 षटकारासह 13 धावा केल्या. सावंतवाडीतर्फे पंकज परबने 7 धावांत 3 तर गौरव हेर्लेकर व नित्यानंद मांजरेकर यांनी प्रत्येकी 2 तर सागर वैरकर व प्रतिम माईनकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
तिसऱ्या सामन्यात बेळगाव तरुण भारतने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी बाद 78 धावा केल्या. त्यात सुहास रावळने 3 षटकार 2 चौकारांसह 35, दत्ता धुरीने 4 चौकारांसह 21 धावा केल्या. तरुण भारत-गोवातर्फे प्रज्योत नाईकने 15 धावांत 2 गडी तर रामकृष्णाने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना गोवा संघाने 8 षटकात 9 गडी बाद 47 धावा केल्या. त्यात महेश मयेकरने 3 चौकारांसह 15, कार्तिकेश पारदेकरने 1 षटकार 1 चौकारासह 13 धावा केल्या. बेळगावतर्फे तन्वीरने 3 धावांत 3, सुहास रावळने 4 धावांत 2, निखिल नाईकने 11 धावांत 2 तर अमरिश असोलकर व मयुर बाळकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
चौथ्या सामन्यात कोल्हापूर संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 3 गडी बाद 58 धावा केल्या. त्यात संग्राम चाबुकने 1 षटकार 3 चौकारांसह 35, यश हंजीने 2 चौकारांसह 20 धावा केल्या. कार्पोरेटतर्फे सागर पाटीलने 8 धावांत 2 तर अरविंद मानेने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना कार्पोरेट संघाने 7 षटकात 3 गडी बाद एकूण 60 धावा करुन सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात गणेश कंग्राळकरने 1 षटकार 2 चौकारांसह 30, कृष्णा धाडवेने 13 धावा केल्या. कोल्हापूरतर्फे स्वप्नील पाटीलने 19 धावांत 2 तर केतन जाधवने 1 गडी बाद केला.
पाचवा सामन्यात म्हापसा संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी बाद 87 धावा केल्या. त्यात गोविंद पालेकरने 3 षटकार 1 चौकारासह 37, मयुरवीरने 2 षटकार 2 चौकारासह 23, तर अनय नाईकने 2 चौकारांसह 15 धावा केल्या. मुंबईतर्फे स्वप्नील चिखलकरने 13 धावांत 2 तर दर्गेने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तदाखल खेळताना मुंबईने 8 षटकात 4 गडी बाद 60 धावा केल्या. त्यात अक्षय गाणेकरने 3 चौकारांसह 22 तर दर्शन निंबाळकरने 12 धावा केल्या. म्हापसातर्फे मयुरवीर, प्रदीप बोकडे, नितेश शेटगावकरने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
शनिवारी उपांत्य पहिला सामना बेळगाव तरुण भारत विरुद्ध सावंतवाडी यांच्यात सकाळी 10 वाजता तर दुसरा उपांत्य सामना कार्पोरेट बेळगाव विरुद्ध म्हापसा-गोवा यांच्यात दुपारी 12 वाजता खेळविला जाणार असून अंतिम सामना दुपारी 2.30 वाजता खेळविला जाणार आहे.