महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोरोना परतला, महिलेच्या निंद्य घटनेची देशभर चर्चा

06:30 AM Dec 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केरळनंतर कर्नाटकात कोरोना परतला असून राज्यात आता सतकर्तेचे आदेश देण्यात आले आहेत. बेंगळूरात एका कोरोना रुग्णाचा मृत्यु झाल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. तर दुसरीकडे न्यू वंटमुरीतील महिलेच्या निंद्य प्रकारची राज्यासह देशभरात चर्चा सुरु आहे. राज्यातील व केंद्रातील भाजपने यावर आवाज उठवला आहे. केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकातही खबरदारी घेतली जात आहे. सरकारने 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती व बाळंतिणींनी सक्तीने मास्क परिधान करण्याची सूचना केली आहे. खासकरून केरळ व तामिळनाडूच्या सीमेवर खबरदारी घेण्याबरोबरच आरोग्य व्यवस्था अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे. एक-दोन दिवसात राज्य सरकारकडूनही मार्गसूची जारी करण्यात येणार आहे. सध्या तरी भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र, खबरदारी घ्या, अशी सूचना सरकारने केली आहे. देशात जेएन-1 चे बोटावर मोजण्याइतके रुग्ण असले तरी कर्नाटकात नव्या व्हेरियंटमुळे बेंगळूरमधील चामराजपेठ येथील एक रुग्ण दगावला आहे. त्यामुळे खबरदारी वाढविण्यात आली आहे. केरळमधील परिस्थिती लक्षात घेऊन कर्नाटकासाठी नवी मार्गसूची तयार करण्यात येणार आहे.

Advertisement

गेल्या आठवड्यात कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधमध्ये झालेले अधिवेशन वेगवेगळ्या कारणाने गाजले. या अधिवेशनात तर सरकारची कोंडी करण्याचा चंग बांधलेल्या भाजप नेत्यांचा होमवर्क कमी पडल्याने कोणताही प्रभाव दिसून आला नाही. उलट विरोधी पक्षातच एक स्वतंत्र विरोधी गट तयार झाल्याचे जाहीर झाले. बसनगौडा पाटील-यत्नाळ हे तर नवे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि नवे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांना मानायला तयार नाहीत. अधिवेशनाच्या काळातच स्वकीय नेत्यांवरच ते तुटून पडले. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी, हेवेदावे अद्याप संपले नाहीत, याची प्रचिती आली. अधिवेशनानंतर भाजप हायकमांडने बसनगौडा पाटील-यत्नाळ यांना दिल्लीला बोलावून घेतले आहे. विधानसभेत अनेकवेळा विरोधी पक्षनेते व भाजप आमदार यांच्यात समन्वयाचा अभाव दिसला. या वादावर हायकमांड कोणती भूमिका घेणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Advertisement

बेळगाव येथील अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतरही राष्ट्रीय पातळीवर आणखी एका निंद्य प्रकाराची चर्चा सुरू आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह संपूर्ण सरकारच बेळगावात असताना बेळगाव तालुक्यातील न्यू वंटमुरी गावातील एका महिलेला विवस्त्र करून तिच्यावर हल्ला करण्यात आला. प्रेम प्रकरणातून पलायन केलेल्या युगुलातील तरुणाच्या आईबरोबर हे अमानवी कृत्य करण्यात आले. राज्य उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रसन्न वराळे यांनी तर हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. न्यायालयाने स्वत:च पुढाकार घेत जनहित याचिका दाखल करून घेऊन शासकीय यंत्रणेवर आगपाखड केली. राज्य सरकारने सध्या या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे दिली आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पथकही बेळगावात ठाण मांडून आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण मानवी समाजाची मान शरमेने खाली गेल्याची टिप्पणी केली आहे. द्रौपदी वस्त्रहरणाचा उल्लेख करीत तिच्या मदतीला कोणीच कसे काय धावून आले नाहीत? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

या प्रकरणावरून एखाद्या घटनेच्यावेळी केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्या संवेदनाशून्य समाजमनाबद्दल संताप व्यक्त होत आहे. न्यायालयाने तर संवेदनाशून्य बघ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्याची सूचना केली आहे. अशा निंद्य घटनेवेळी केवळ मूक दर्शक बनून राहिलेल्यांना धडा शिकविण्याचा नवा पायंडा तर न्यायालयाने घातला आहेच, शिवाय इतका भयानक प्रसंग समोर घडत असूनही थंडपणे उभ्या राहिलेल्या जनमानसाबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपने तर पाच महिला खासदारांची सत्यशोधक समिती बेळगावला पाठविली होती. या मुद्द्यावर भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने कर्नाटक सरकारवर टीका केली आहे. पीडितेला संरक्षण देण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा यांनी केला आहे. विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच झालेल्या या घटनेचे सध्या देशभरात पडसाद उमटत आहेत.

यापूर्वीही अनेक घटनात जमावाच्या भावनाशून्य मन:स्थितीचे दर्शन घडले आहे. एखादी घटना घडल्यानंतर मदतीला न जाणाऱ्यांबद्दल चर्चा होते. त्याची कारणे काय असतील, याच्यावर चर्वितचर्वण होते. 10 डिसेंबर 2023 रोजी मध्यरात्री घडलेल्या या घटनेचे स्वत: उच्च न्यायालयाने दखल घेऊन यंत्रणेला धारेवर धरल्यामुळे यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी घटप्रभा येथे एका महिलेच्या गळ्यात चपलांचा हार घालून तिची धिंड काढण्यात आली होती. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. खासगी वाहिन्यांनीही ती दृश्ये दाखविली. आता त्याहूनही एक पाऊल पुढे जात महिलेला विवस्त्र करून तसेच खांबाला बांधून तिला मारहाण करण्यात आली आहे.

बेळगाव येथील घटनेबरोबरच आणखी एका कारणासाठी कर्नाटक ठळक चर्चेत आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी बेंगळूरसह कर्नाटकातील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून दहशतवादी कारवायांत गुंतलेल्या तिघा संशयितांना अटक केली आहे. नववर्षाच्या तोंडावर स्फोट घडविण्यासाठी कट रचणाऱ्यांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. याबरोबरच संसदेत घुसखोरी करणाऱ्या म्हैसूरच्या मनोरंजनमुळेही केंद्रीय यंत्रणा कर्नाटकात तळ ठोकून आहेत. केंद्रीय यंत्रणांनी मनोरंजनच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली आहे. अशा अनेक घटनांमुळे गेले पंधरा दिवस अस्वस्थतेचे ठरले आहेत. राजकीय चढाओढ, अप्रिय घटनांची मालिका सुरू असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. दुष्काळ निवारणासाठी 18,177 कोटी रुपये निधी त्वरित मंजूर करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. कर्नाटकातील 236 तालुक्यांपैकी 223 तालुके दुष्काळग्रस्त आहेत. यापैकी 196 तालुक्यांमध्ये भीषण दुष्काळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कर्नाटकात सर्वाधिक टीका सिद्धरामय्या यांनी केली आहे. या राजकीय टीकेपलीकडे जाऊन पंतप्रधान व मुख्यमंत्री यांची भेट झाली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article