कॉपी इंग्रजीत, कारवाई हिंदीच्या विद्यार्थ्यांवर
कोल्हापूर :
हिंदी विषयाचा पेपर सुरु असताना राजाराम कॉलेज येथील परीक्षा केंद्रामध्ये काही विद्यार्थ्याच्या बेंचजवळ इंग्रजीतील कागद सापडला. मात्र, शिवाजी विद्यापीठाच्या भरारी पथकाने इंग्रजीतील चिठ्ठी हिंदी विषयाच्या उत्तरपत्रिकेला जोडून कॉपी सापडल्याची कारवाई विद्यार्थ्यावर केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. या कारवाईला विद्यार्थ्यांसह पालकांनीही आक्षेप घेतला.
सध्या हिवाळी सत्रातील परीक्षा सुरु आहेत. राजाराम कॉलेज येथील परीक्षा केंद्रामध्ये बी. एस्सी. केमिस्ट्री व बी. ए. भाग एकचा हिंदी विषयाचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था एकाच वर्गात केली होती. शुक्रवारी दुपारी साडेबाराला भरारी पथक केंद्रावर आले असता त्यांना काही विद्यार्थ्यांच्या आसनाजवळ कागद सापडले. पथकाने इंग्रजीतील चिठ्ठी हिंदी विषयाच्या उत्तरपत्रिकेला जोडून कॉपी सापडल्याची कारवाई केली. मात्र, ही कारवाई अयोग्य असून त्या विद्यार्थ्यांचे नुकसान करु नये, अशी मागणी पालकांनी केली.
दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी केंद्रावर भेट देत वर्गांच्या स्वच्छतेच्या सूचना प्राचार्यांना दिल्या.