कॉपर अॅण्ड पेपर रेस्टॉरंटने थकविला 50 हजार रुपयांचा दंड
मनपाच्या आरोग्य विभागाची कारवाई
बेळगाव : रेस्टॉरंटमधील अस्वच्छतेबाबत महात्मा फुले रोडवरील कॉपर अँड पेपर रेस्टॉरंटवर 50 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र रेस्टॉरंट चालकाने दंडाची रक्कम अद्याप महापालिकेला भरली नसल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाच्यावतीने गुरुवारच्या आरोग्य स्थायी समिती बैठकीत देण्यात आली. त्यामुळे सदर रक्कम कशी वसूल करणार, हे मात्र पाहावे लागणार आहे. महापालिकेला विविध माध्यमातून महसूल जमा व्हावा यासाठी महसूल आणि आरोग्य आणि विभागाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. थकीत घरपट्टी वसूल करण्यासह व्यापार परवाना आणि हॉटेल्समध्ये स्वच्छता न ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पण गुरुवारच्या बैठकीत म्हणावा तसा अपेक्षित महसूल मनपाला न मिळाल्याने आरोग्य विभागाला धारेवर धरण्यात आले. अलीकडेच शहर आणि उपनगरातील काही हॉटेल्स व रेस्टॉरंटवर स्वच्छता न राखल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यापैकी काही हॉटेल्स चालकांनी दंडाची रक्कम भरली आहे. महात्मा फुले रोडवरील कॉपर अँड पेपर रेस्टॉरंटच्या स्वयंपाकगृहात आरोग्य खात्याने केलेल्या पाहणीदरम्यान स्वच्छता राखण्यात न आल्याचे दिसून आले. त्यामुळे आरोग्य विभागाकडून रेस्टॉरंटला 50 हजारांचा दंड बजावण्यात आला होता. दंडाचे चलन देखील दिले होते. पण दंडाची रक्कम मनपाला भरण्यात आली नसल्याने अधिकाऱ्यांची गोची झाली आहे. त्यामुळे ही बाब अधिकाऱ्यांनी गुरुवारच्या बैठकीत निदर्शनास आणून दिली.