For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोपा अमेरिका फुटबॉल : व्हेनेझुएला उपांत्यपूर्व फेरीत दाखल

06:00 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
कोपा अमेरिका फुटबॉल   व्हेनेझुएला उपांत्यपूर्व फेरीत दाखल
Advertisement

व्हेनेझुएलाचा मेक्सिकोवर विजय, जमैका स्पर्धेबाहेर, इक्वेडोरचे आव्हान जिवंत

Advertisement

वृत्तसंस्था /लास व्हेगास

2024 च्या कोपा अमेरिका चॅम्पियनशीप फुटबॉल स्पर्धेत व्हेनेझुएला संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना मेक्सिकोवर 1-0 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळविला. दुसऱ्या एका सामन्यात इक्वेडोरने जमैकाचा 3-1 असा पराभव करत स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले. पण जमैकाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. या स्पर्धेत ब गटातील बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात व्हेनेझुएला आणि मेक्सिको या दोन्ही संघांनी दर्जेदार खेळ केला. शेवटच्या मिनीटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात व्हेनेझुएलाच्या

Advertisement

सॉलोमन रॉन्डनने पेनल्टीवर एकमेव निर्णायक गोल करत आपल्या संघाला उपांत्यपूर्व फेरीत नेले. व्हेनेझुएलाने प्राथमिक फेरीत दोन सामन्यांतून 6 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले. मेक्सिकोला या सामन्यात हार पत्करावी लागली असली तरी त्यांना बाद फेरीत प्रवेश मिळविण्याची अद्याप संधी आहे. मेक्सिकोचा ब गटातील शेवटचा सामना इक्वेडोरबरोबर होणार आहे. या सामन्यात त्यांनी विजय नोंदविल्यास त्यांना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळू शकेल. लॉस एन्जिल्सच्या सोफी स्टेडीयमवर मेक्सिको आणि व्हेनेझुएला यांच्या सामन्याला सुमारे 40 हजार शौकिनांनी उपस्थिती दर्शविली. दोन्ही संघांच्या बचाव फळीने भक्कम कामगिरी केल्याने सामन्यातील 57 व्या मिनीटांपर्यंत गोलफलक कोराच होता. 57 व्या मिनीटाला रॉन्डनने पेनल्टीवर व्हेनेझुएलाचे खाते उघडले. 87 व्या मिनीटाला मेक्सिकोला पेनल्टीची संधी मिळाली. पण पिनेडाने मारलेला फटका व्हेनेझुएलाचा गोलरक्षक रोमोने अचुकपणे थोपविल्याने मेक्सिकोला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही.

या स्पर्धेतील बुधवारी खेळविण्यात आलेल्या ब गटातील अनेका एका सामन्यात इक्वेडोरने जमैकाचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करत पूर्ण गुण वसुल केले. यामुळे इक्वेडोरचे बाद फेरीत पोहोचण्याचे आव्हान जीवंत राहिले. पण जमैकाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सामना सुरू झाल्यानंतर 13 व्या मिनीटाला जमैकाच्या पिएरो हिंनकॅपने नजरचुकीने आपल्याच संघाच्या गोलपोस्टमध्ये चेंडु लाथाडल्याने इक्वेडोरचे खाते या बोनस गोलामुळे उघडले. मध्यंतराला केवळ दोन मिनीटे बाकी असताना केंड्री पेझने पेनल्टीवर इक्वेडोरचा दुसरा गोल केला. 91 व्या मिनीटाला अॅलन मिनेडाने जमैकाच्या बचाव फळीतील खेळाडूंना व गोल रक्षकाला हुलकावणी देत इक्वेडोरचा तिसरा गोल केला. जमैकातर्फे एकमेव गोल 73 व्या मिनीटाला नोंदविला गेला. या सामन्यानंतर ब गटात इक्वेडोरने मेक्सिको समवेत समान तीन गुण मिळविले आहेत. आता मेक्सिकोचा इक्वेडोरबरोबरच ब गटातील शेवटचा सामना रविवारी खेळविला जाणार आहे. या सामन्यानंतर ब गटातील उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविणारे संघ निश्चित होतील.

सामन्यांचे निकाल

  • व्हेनेझुएला वि. वि. मेक्सिको, 1-0
  • इक्वेडोर वि. वि. जमैका,  3-1
Advertisement
Tags :

.