For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेल्वेस्थानकासमोरील गाळ्यांच्या ई-निविदा प्रक्रियेला थंडा प्रतिसाद

10:08 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
रेल्वेस्थानकासमोरील गाळ्यांच्या ई निविदा प्रक्रियेला थंडा प्रतिसाद
Advertisement

डिजिटल सिग्नेचरच्या अटीमुळे इच्छुकांची माघार

Advertisement

बेळगाव : रेल्वेस्टेशनसमोरील स्मार्ट सिटी बसस्थानकातील दुकान गाळ्यांच्या ई-निविदा प्रक्रियेला थंडा प्रतिसाद मिळाला. रोडावलेली प्रवाशांची संख्या, त्यात कॅन्टोन्मेंट बोर्डने निविदा प्रक्रियेसाठी डिजिटल सिग्नेचर सक्तीचे केल्याने प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे या दुकान गाळ्यांसाठी पुन्हा एकदा निविदा काढण्याचा विचार कॅन्टोन्मेंट बोर्डकडून सुरू आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डने रेल्वेस्थानकासमोरील स्मार्ट सिटी बसस्थानकातील 1 ते 6 दुकान गाळ्यांसाठी निविदा मागविल्या होत्या. इच्छुकांनी 8 ते 23 फेब्रुवारी दरम्यान, निविदा भरावयाच्या होत्या. कॅन्टोन्मेंट बोर्डने यासाठी 5500 रु. भाडे निश्चित केले होते. तसेच एका वर्षाचे भाडे अॅडव्हान्स स्वरुपात घेतले जाणार होते. पूर्वीच्या भाड्यापेक्षा नवीन भाडे कमी केल्याने निविदा भरल्या जातील, असा विश्वास होता. परंतु, या निविदा प्रक्रियेला तितकासा प्रतिसाद मिळू शकला नाही.

बसस्थानकातील प्रवाशांची संख्या रोडावल्यामुळे निविदा भरण्यासाठी नागरिक इच्छुक नसल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वी कारवार बसस्थानकात कोकणासह खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावाला जाणाऱ्या बस तसेच कारवार व गोवा येथे जाणाऱ्या बसेसही थांबविल्या जात होत्या. परंतु, सध्या बऱ्याच बस या गोगटे सर्कलमार्गे कारवार व गोव्याच्या दिशेने जात असल्यामुळे प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. याचा परिणाम या दुकान गाळ्यांच्या निविदा प्रक्रियेवर दिसून आला. कॅन्टोन्मेंट बोर्डकडून पहिल्या टप्प्यात 1 ते 6 तर दुसऱ्या टप्प्यात 6 ते 12 क्र. दुकान गाळे भाडेतत्त्वावर दिले जाणार होते. परंतु, दुकान गाळ्यांत असलेली अस्वच्छता व डिजिटल सिग्नेचर यामुळे नागरिकांनी प्रतिसाद दिलेला नाही. डिजिटल सिग्नेचरसाठी 2 ते अडीच हजार रुपये खर्च येत असल्याने निविदा प्रक्रियेला थंडा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डने निविदा प्रक्रियेतील अटी शिथिलची मागणी केली जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.