अग्निवीरांच्या सहाव्या तुकडीचा दीक्षांत समारंभ
प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे बुधवारी अग्निवीरांच्या सहाव्या तुकडीचा दीक्षांत समारंभ अत्यंत शानदारपणे पार पडला.31 आठवड्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर 484 अग्निवीरांना कर्तव्यदक्षतेची शपथ देण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून मेजर जनरल हरिभास्करन पिल्लाई (एडीजी रिव्रुटिंग) उपस्थित होते.सर्व अग्निवीरांनी राष्ट्रध्वज तसेच रेजिमेंट ध्वज यांच्यासमोर कर्तव्यपूर्ततेची शपथ घेतली. यावेळी अग्निवीरांचे पालक, निमंत्रित तसेच एनसीसी छात्र उपस्थित होते. यावेळी अग्निवीरांनी शानदार पथसंचलन केले. त्याचे नेतृत्व अग्निवीर पवन यल्लकुरी यांनी केले.
यावेळी अग्निवीर सूरज मोरे यांना प्रतिष्ठेचे नाईक यशवंत घाडगे हे पदक उत्कृष्ट अग्निवीर म्हणून देण्यात आले. शरकत वॉर स्मारकावर पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच गौरवपदक देऊन पालकांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्यासह इन्फंट्रीचे अधिकारी उपस्थित होते.