घराघरात काँग्रेसचा विचार पोहचवा! विनयकुमार सोरके यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
सातारा प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला यश मिळवायचे असेल तर घराघरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाऊन काँग्रेसचे विचार पोहचवले पाहिजेत. तसेच बूथ कमिटी बळकट करून हर घर बूथ कार्यकर्ता तयार होणे आवश्यक आहे, महाविकास आघाडीकडे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघ काँग्रेसला मिळावेत अशी आपण केलेली मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे देऊन तीन मतदारसंघासाठी प्रयत्न करेन, असे निरीक्षक विनयकुमार सोरके यांनी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये आयोजित बैठकीत बोलताना सांगितले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक कर्नाटकचे माजी मंत्री व माजी खासदार विनयकुमार सोरके यांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभेचे मतदारसंघाचे आढावा घेतला. जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, पदाधिकारी यांच्या सूचना घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ. अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, अजित पाटील चिखलीकर, धनश्री महाडिक, सौ. रजनी पवार, गीतांजली थोरात, अनवर पाशा खान, उमेश साळुंखे, जगन्नाथ कुंभार, अशोकराव पाटील, प्रतापराव देशमुख, संदीप चव्हाण, श्रीकांत चव्हाण, श्रीनिवास थोरात, अभिजीत पाटील, विलास पिसाळ, संदीप माने, दत्तात्रय धनावडे, बाबासाहेब कदम, रफीक बागवान, तारिक बागवान आदी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी जिल्हा काँग्रेसचे सदस्य अशोकराव पाटील यांनीही सूचना मांडल्या. माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काम करीत आहोत ,असे सांगण्यात आले.