लमाणी तांड्यांमधील 26 जणांचे मनपरिवर्तन
बेळगाव : रामदुर्ग तालुक्यातील 18 लमाणी तांड्यांमध्ये धर्मांतर करण्यात येत असल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर या तांड्यांमधून समाजाच्या प्रमुखांनी जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतून 26 जणांची घरवापसीही करण्यात आली आहे. 25 डिसेंबर रोजी धर्मांतराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. माजी आमदार पी. राजीव यांच्यासह समाजाच्या अनेक प्रमुखांनी ओबळापूर तांड्याकडे धाव घेतली होती. तांड्यातील नागरिकांची बैठक घेऊन धर्मांतर रोखण्यासाठी त्यांची मनधरणी करण्यात आली. 26 जणांची घरवापसी झाली असून या तांड्यांतील दोन कुटुंबीयांनी मात्र घरवापसीला नकार दिला आहे. या कुटुंबातील एक जण रेल्वे खात्याचा कर्मचारी आहे तर एक महिला अंगणवाडी कार्यकर्ती आहे. जनजागृतीसाठी गेलेल्या नेत्यांच्या विनवणीला दोन कुटुंबीयांनी जुमानले नाही. ‘आम्ही आमच्या आई-वडिलांचाही फोटो घरात लावत नाही तर संत सेवालाल महाराजांचा फोटो कसा लावणार?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माजी आमदार पी. राजीव, पोलीस उपनिरीक्षक सुनील नायक, शंकर चव्हाण, सोमाप्पा जाधव आदींनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांनी जुमानले नाही म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची सूचना करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यात 40 तांडे आहेत. काही तांड्यांमधून धर्मांतर करण्यात आले आहे. संपूर्ण माहिती मिळविल्यानंतर धर्मांतराविरुद्ध आंदोलन करणार असल्याचे शंकर चव्हाण यांनी सांगितले. महाराष्ट्रातील बंजारा ब्रिगेडचे अध्यक्ष रविकांत राठोड, धर्मसुधारक गुरुप्रसाद तुळसी नायक, मल्लण्णा यादवाड आदी यावेळी उपस्थित होते.