राहुल गांधी यांच्या व्हिएतनाम दौऱ्यावरून वाद
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मनमोहन सिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांना योग्य तो सन्मान देण्याच्या प्रश्नावरून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात वादंग पेटलेले असतानाच, आता राहुल गांधी यांच्या व्हिएतनाम दौऱ्याची त्यात भर पडली आहे. गांधी हे सोमवारी व्हिएतनाम दौऱ्यावर गेले आहेत. मनमोहन सिंग यांच्या मृत्यूमुळे देश शोकात असताना गांधी यांना व्हिएतनाम दौरा महत्वाचा वाटला. यावरूनच ते मनमोहन सिंग यांना किती मान देशात हे दिसून आले, अशी खोचक टीका भारतीय जनता पक्षाचे माहिती तंत्रज्ञान कक्षप्रमुख अमित मालवीय यांनी केली.
‘काँग्रेसने नेहमीच शीख समुदायाचा अपमान केला आहे. इंदिरा गांधी यांनी अम्रतसरच्या सुवर्ण मंदिरात सेना पाठविली होती. त्यांच्या हत्येनंतर झालेल्या शीखांच्या विरोधात मोठा हिंसाचार झाला होता. हजारो शीख मारले गेले होते. तीच काँग्रेस आज मनमोहन सिंग यांच्यासंबंधी नक्राश्रू ढाळत आहे. काँग्रेसचे शीखप्रेम बेगडी आहे, असाही वार अमित मालवीय यांनी त्यांच्या संदेशात केला आहे.
काँग्रेसचे प्रत्युत्तर
भारतीय जनता पक्षाच्या टीकेला काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. हे संघवाले समाजाचे लक्ष दुसरीकडे हटविण्याचे त्यांचे तंत्र केव्हा बंद करणार, असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते मणिकम टागोर यांनी विचारला आहे. राहुल गांधी यांचा व्हिएतनाम दौरा खासगी आहे. भारतीय जनता पक्षाचा याच्याशी काय संबंध आहे? असा प्रश्नही टागोर यांनी विचारला आहे. राहुल गांधी यांना कोठेही जाण्याचा अधिकार आहे. त्यांना प्रश्न विचारण्याचा किंवा त्यांच्या दौऱ्यांवर टिप्पणी करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असेही प्रतिपादन टागोर यांनी केले.
दौऱ्यासंबंधी उत्सुकता
राहुल गांधी सोमवारी अचानक व्हिएतनाम दौऱ्यावर गेले. त्यांच्या या दौऱ्याची आधी कोणालाही कल्पना नव्हती. काँग्रेस नेत्यांनाही त्या संदर्भात काही माहिती नव्हते, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्यासंबंधी राजकीय वर्तुळात उत्सुकता व्यक्त केली जात आहे. हा दौरा खासगी असला तरी गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. तसेच ते काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे व्हिएतनामला काय काम असावे, असाही प्रश्न राजकीय वर्तुळात, तसेच सोशल मिडियावरूनही विचारण्यात येत आहे.
गांधींची ही सवयच
राहुल गांधी अनेकदा असे विदेश दौऱ्यावर जातात. एखादी मोठी निवडणूक पार पडली की ते विदेश दौरा करतात असे बऱ्याचवेळा दिसून आले आहे. त्यांच्या दौऱ्याविषयी आधी माहिती पक्षाकडून किंवा त्यांच्याकडूनही बऱ्याचदा दिली जात नाही. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यांचे अनेकांना कुतुहल वाटते, अशी चर्चा आहे. ते व्हिएतनाम दौऱ्यावरुन कधी परत येणार, याविषयीही स्पष्टता नसल्याचे समजते.