‘नो हँडशेक’ वरुन वादंग
हस्तांदोलनाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानची आगपाखड : सामनाधिकारी पायक्रॉफ्ट यांच्या हकालपट्टीची केली मागणी
वृत्तसंस्था/ दुबई
दुबईमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. आशिया कपच्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला 7 विकेट्सने पराभूत केले. पण, सामन्यानंतर आणि टॉसच्या वेळीही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशन सेरेमनीमध्येही उपस्थित राहिला नाही. आता, पीसीबीने थेट आयसीसीकडे तक्रार केली असून भारत-पाकिस्तान यांच्या सामन्यातील पंचाची हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणानंतर जगासमोर लाज निघाल्याने त्याचे खापर त्यांनी आपल्याच अधिकाऱ्यावर काढले असून त्याला निलंबित केले आहे. पीसीबीने नो शेकहँड वादावरुन एसीसी आणि आयसीसीकडे भारतीय संघाची तक्रार केली आहे. पीसीबीने थेट सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर निशाणा साधत त्यांना आशिया चषकातून हाकलून देण्याची मागणी करण्यात आली आहे. पायक्रॉफ्ट यांची आशिया कपमधील मॅच रेफरी पॅनल लिस्टमधून हकालपट्टी करावी, अन्यथा आशिया चषक स्पर्धेतून पाकिस्तान आपले नाव मागे घेईल, असा इशाराही पाक बोर्डाने दिला आहे. पायक्रॉफ्ट यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत, नाणेफेक करीत असताना भारत आणि पाकिस्तान संघाच्या दोन्ही कर्णधारांना हस्तांदोलन न करण्याच्या सूचना दिल्या. त्यावरुन, पीसीबीने नाराजी व्यक्त करत सामनाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
आपल्याच अधिकाऱ्याला केले निलंबित
भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंनी कोणताही संबंध ठेवण्याचे टाळले. सामन्यानंतरही भारतीय संघ पाकिस्तानी संघासोबत हात न मिळवताच ड्रेसिंग रुममध्ये परतला. या घटनेची जोरदार चर्चा झाली. पीसीबीने याबाबत भारतीय संघाची तक्रारही आयसीसीकडे केली. आता याच प्रकरणामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चक्क स्वत:च्याच अधिकाऱ्यावर कडक कारवाई करताना आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संचालक उस्मान वाहला यांनाच त्यांच्या पदावरून काढून टाकले आहे. हस्तांदोलन वादाचे प्रकरण योग्यप्रकारे हाताळण्यात अयशस्वी ठरल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आयसीसी किंवा एसीसीचा नियम काय सांगतो
आयसीसीच्या नियमांमध्ये कुठेही असे लिहिलेले नाही की हस्तांदोलन आवश्यक आहे. टॉसच्या वेळी किंवा सामन्यानंतर हस्तांदोलन करणे हा क्रीडा वृत्तीचा एक भाग आहे. क्रिकेटच्या भावनेमुळेच खेळाडू प्रत्येक सामन्यानंतर एकमेकांना भेटतात. जेव्हा हस्तांदोलन करण्याचा कोणताही नियम नाही, तेव्हा संघाला किंवा कोणत्याही खेळाडूला दंड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जर कोणी या दरम्यान गैरवर्तन केले किंवा काही अपशब्द वापरले तर दंड आकारला जाऊ शकतो, परंतु कालच्या सामन्यात असे काहीही घडले नाही. परंतु जर कोणी जाणूनबुजून विरोधी संघाशी किंवा खेळाडूशी हस्तांदोलन केले नाही, तर ते खेळाच्या भावनेविरुद्ध मानले जाऊ शकते.
हा पाकिस्तानचा संघ नाही तर कोणतातरी पोपटवाडीचा संघ आहे. भारतीय संघाचा निर्णय योग्य होता. आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहोत.
सुनील गावसकर, भारताचे माजी क्रिकेटपटू
हस्तांदोलन न करणे हा एक ‘डाग आहे, जो त्यांना आयुष्यभर सोबत घेऊन फिरावा लागेल. याआधीही युद्धे झाली, पण आम्ही नेहमीच हस्तांदोलन केले आहे. पहलगाम हल्ल्याबद्दलच्या भावना योग्य आहेत, पण जेव्हा तुम्ही मैदानात असता तेव्हा खेळ योग्य मार्गाने खेळला पाहिजे.
रशिद लतिफ, पाकचा माजी कर्णधार
क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये. घरातील वाद विसरून पुढे गेले पाहिजे. झालेला प्रकार दुर्दैवी आहे.
शोएब अख्तर, पाकचा माजी वेगवान गोलंदाज