मुख्यमंत्र्यांची भाऊसाहेबांशी तुलना केल्याने वादंग
विजय सरदेसाई हीच खरी गोव्याची समस्या : मुख्यमंत्री
सरदेसाईंची अस्मिता तेव्हा कुठे गेली होती : व्हिएगस
माझा नव्हे, मुख्यमंत्र्यांचा ‘इगो’ जागा झाला : सरदेसाई
पणजी : गोव्याचे भाग्यविधाते तथा पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्याशी तुलना करून आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कौतुक केल्यानंतर या विषयावरून सध्या राज्यातील लोकप्रतिनिधींमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आमदार विजय सरदेसाई यांनी भाऊसाहेब बांदोडकर यांची तुलना मुख्यमंत्री सावंत यांच्याशी केल्यामुळे आक्षेप घेतला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री डॉ. सावंत व आमदार वेन्झी यांनी विजय सरदेसाई यांच्यावरही गंभीर आरोप केलेले आहेत.
काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे आमदार व्हेंझी व्हिएगश यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची तुलना भाऊसाहेब बांदोडकर यांच्याशी केली होती. भाऊसाहेबांनी ज्या पद्धतीने गोव्याचा विकास साधला, तसाच विकास डॉ. सावंत यांच्याकडून होत असल्याचेही ते म्हणाले होते. यावरून आक्रमक झालेल्या आमदार विजय सरदेसाई यांनी आमदार व्हेंझी व्हिएगश यांच्यावर टीका केली. त्यावेळी त्यांनी विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. विलिनीकरणासंदर्भात भाऊसाहेब बांदोडकर यांनी घेतलेली भूमिका चुकीची होती, असे सरदेसाई यांनी म्हटले होते.
याच मुद्यावर बोट ठेवताना मुख्यमंत्री सावंत यांनी भाऊसाहेब बांदोडकर यांना गोव्याच्या अस्मितेची अॅलर्जी होती, हा आमदार विजय सरदेसाई यांचा दावा म्हणजे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री ठरलेल्या भाऊसाहेबांचा घोर अपमान आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगत आमदार सरदेसाई यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. राज्याची खरी समस्या आमदार सरदेसाई यांच्या फुगलेल्या अहंकाराची आहे, असा पलटवार मुख्यमंत्री सावंत यांनी करीत विजय सरदेसाई हेच गोव्याची खरी समस्या आहेत, असेही ते म्हणाले. भाऊसाहेब बांदोडकर यांनी नेहमीच गोव्याची ओळख जपली. राज्याचा विकास साधला, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
सरदेसाई यांनाच अॅलर्जी : वेर्णेकर
माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकरांना ‘दलाल’ म्हटल्यानंतर आता विजय सरदेसाई यांनी भाऊसाहेब बांदोडकर यांच्यावरही टीका केली आहे. यावरूनच विजय सरदेसाई यांना गोव्याच्या महान नेत्यांवर टीका करण्याची सवय लागल्याचेच दिसते. अर्जेंटिनात जन्मलेल्या आमदार सरदेसाई यांनाच गोव्याची अॅलर्जी झाली आहे, असा गंभीर आरोप गोवा प्रदेश भाजपचे प्रवत्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी केला.
‘इगो’ मला नाही, मुख्यमंत्र्यांना : विजय
आमदार व्हेंझी व्हिएगश यांनी भाऊसाहेब बांदोडकरांशी तुलना केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचाच ‘इगो’ जागा झाला आहे. भाऊसाहेबांशी तुलना कोणत्याच मुख्यमंत्र्याशी होऊ शकत नाही, असे मगोचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री सुदिन ढवळीकर यांनीही यापूर्वीच सांगितलेले आहे. आमदार व्हेंझी व्हिएगस आणि मुख्यमंत्री सावंत यांनी याचा बोध घ्यावा. भाऊसाहेबांनी कूळ-मुंडकार कायदा आणून गोव्याच्या शेत जमिनी सुरक्षित ठेवल्या. परंतु मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मात्र नवा कायदा आणून इतर राज्यांतील शेतकऱ्यांना या जमिनी विकल्या, असा आरोपही आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे.
विजयची अस्मिता त्यावेळी कुठे गेली?
2017 मध्ये ‘यू टर्न’ घेऊन विजय सरदेसाई यांनी भाजपला पाठिंबा देऊन सत्तेत सहभाग घेतला. त्यावेळी विजयची अस्मिता कुठे गेली होती. धमक असेल तर विजय सरदेसाई यांनी जमीन ऊपांतरण थांबवून दाखवावे. स्वत:च्या जमिनींचे ऊपांतरण करून घेणे बंद करूनच दुसऱ्यांवर आरोप करावेत. विजय सरदेसाई हे केवळ भाषणे देण्यातच माहीर आहेत. मुळात ते भाजप सरकारसोबतच आहेत, असा आरोप आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी केला.