Hupari Election | हुपरी नगरपरिषदेसाठी निवडणुकीत वादावादीमुळे गालबोट; लाठीमार
विक्रमी ८०.५५ टक्के मतदान; २१ डिसेंबर रोजी मतमोजणी
हुपरी : हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील नगरपरिषदेसाठी निवडणुकीत सर्व प्रभागात सरासरी ८०.५५ टक्के विक्रमी मतदान झाले. एकूण नगरपरिषेदेत २०,०५३ मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला. काही प्रभागात शांततापूर्ण मतदान झाले तर प्रभाग क्र. ३, ४, ५, ७, ९ आणि अन्य काही केंद्रांवर किरकोळ वाद आणि तणावामुळे निवडणुकीला गालबोट लागले.
नवीन यंत्र बसवून मतदान प्रक्रिया
प्रभाग क्रमांक ७ मध्ये एका उमेदवाराच्या चिन्हावर आक्षेपार्ह खूण आढळल्याने मोठा तणावनिर्माण झाला. मोठ्या प्रमाणात वाद होण्याची शक्यता असताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानी तत्काळ ते वादग्रस्त मतदान यंत्र सील करून नवीन यंत्र बसवून मतदान प्रक्रिया सुरळीत चालू केले.
पोलिसांचा लाठीचार्ज
प्रभाग क्रमांक ४ व ५ मध्ये एका पक्षाच्या कार्यकर्त्याच्या वारवार केंद्रात प्रवेशावरून वाद झाला. पोलिसांनी सांगून देखील ऐकले नसल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करून कार्यकर्त्यांना दूर केले. प्रभाग क्रमांक १० मध्ये सायंकाळी मतदारांना पिटाळताना पोलिसांनी लाठीचार्ज केला, ज्यात एका उमेदवाराचे पती प्रतीक दंडवते यांनाही लाठी लागली. एकूणच, प्रशासनाच्या तगड्या पोलीस बंदोबस्तामुळे किरकोळ घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे.