बिहारमधील पराभवावरून काँग्रेसच्या बैठकीत वादावादी
दोन उमेदवार एकमेकांशी भिडले, गोळीबार करण्याचीही धमकी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर गुरुवारी दिल्लीत काँग्रेसने बोलावलेल्या आढावा बैठकीत मोठा गोंधळ उडाला. सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी येण्यापूर्वीच बैठकीमध्ये वाद सुरू झाला. बिहारमधील वैशाली येथील काँग्रेसचे उमेदवार इंजिनियर संजीव आणि पूर्णिया येथून निवडणूक लढवणारे जितेंद्र यादव यांच्यात झालेल्या जोरदार वादामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. अलिकडे 18 नवीन चेहऱ्यांचा पक्षात समावेश केल्याने काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे आणि अननुभवी उमेदवारांना तिकीट देणे पक्षासाठी विनाशकारी ठरले आहे, असा आरोप इंजिनियर संजीव यांनी केला. संघटनेच्या वास्तवाकडे दुर्लक्ष करून आणि नवीन उमेदवार उभे केल्याने अनेक जागांवर काँग्रेसचा लढा कमकुवत झाला, असे ते म्हणाले. यावर पूर्णियाचे उमेदवार जितेंद्र यादव यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘आम्हीही नवीन आहोत. आज जे अनुभवी नेते आहेत तेही एकेकाळी नवीन होते.
पराभवासाठी नवोदितांना दोष देणे चुकीचे आहे’ असे ठणकावले. त्यांच्या या उत्तरामुळे दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वादविवाद सुरू होताच परिस्थिती आणखीनच भडकली. हा वाद इतका वाढला की इंजिनियर संजीव यांनी जितेंद्र यादव यांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तथापि, संजीव यांनी नंतर संभाषणाचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगत आपल्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे म्हटले. आपला कोणालाही धमकावण्याचा हेतू नव्हता, असेही ते म्हणाले. या वादावर काँग्रेस पक्षाकडून कोणतेही अधिकृत विधान आले नसले तरी बैठकीदरम्यान निर्माण झालेला तणाव पक्षातील अंतर्गत संघर्ष आणि परस्पर अविश्वास अधोरेखित करतो. बैठकीमध्ये पराभवाच्या खऱ्या कारणांवर चर्चा करण्याऐवजी परस्पर आरोप-प्रत्यारोपांमुळे पक्ष संघटना कमकुवत होऊ शकते असा दावा काही ज्येष्ठ नेत्यांनी केला आहे.