कलबुर्गीतील शांतता बैठकीत वादावादी
एकमत न झाल्याने अर्ध्यावर : रा. स्व. संघाने लाठीशिवाय पथसंचलन करण्याची मागणी : उद्या कलबुर्गी खंडपीठात सुनावणी
बेंगळूर : कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूर शहरात रा. स्व. संघाच्या पथसंचलनाच्या आयोजनावरून वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारच्या आदेशाला आव्हान देत दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शांतता सभा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कलबुर्गी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी शांतता सभा घेण्यात आली. परंतु, विविध संघटनांमध्ये वादावादी झाली. त्यामुळे सभा निष्फळ ठरली.
रा. स्व. संघाच्या पथसंचलनाच्या मुद्द्यावर कलबुर्गी जिल्ह्यात तणाव निर्माण झाल्याने शांतता प्रस्थापित करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तथापि, संघटनांमध्ये वादावादी झाली. जयभीम आर्मी संघटनेचे नेते गुंडप्पा यांना आत सोडण्यात न आल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशी वाद घातला. दुसरीकडे बैठकीत रा. स्व. संघ आणि इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. त्यामुळे बैठक अर्ध्यावरच थांबविण्यात आली.
रा. स्व. संघाने लाठी न वापरता पथसंचलन करावे, अशी मागणी इतर संघटनांनी केली. चित्तापूर येथे 2 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संघाच्या पथसंचलनावरून वाद निर्माण झाल्याने कलबुर्गी जिल्हाधिकाऱ्यांनी शांतता बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत रा. स्व. संघ, जयभीम आर्मी, भारतीय दलित पँथर्स आणि चलवादी महासभा या संघटनांच्या प्रतिनिधींना बैठकीला आमंत्रित करण्यात आले होते. तथापि, बैठकीत कुणाचेही एकमत न झाल्याने बैठक अर्ध्यावरच आटोपण्यात आली.
दलित पँथर्स आणि जयभीम आर्मी संघटनेच्या प्रतिनिधींनी रा. स्व. संघाला लाठीशिवाय पथसंचलन करावे, अशी मागणी केली. तर संघ प्रतिनिधींनी संमती दर्शविली नाही. त्यामुळे वाद वाढला. बैठकीतून बाहेर पडल्यानंतर इतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत रा. स्व. संघाविरुद्ध आपला रोष व्यक्त केला. पथसंचलनाबाबत अंतिम निर्णय न झाल्याने आता अंतिम निर्णय उच्च न्यायालयाच्या हाती आहे. बैठकीत एकमत न झाल्याने कलबुर्गी जिल्हा प्रशासनाने सर्व संघटनांची मते लेखी स्वरुपात गोळा करून उच्च न्यायालयात अहवाल सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. कलबुर्गी खंडपीठात गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी संघाच्या याचिकेवर सुनावणी होणार असून राज्यातील जनतेचे त्याकडे लक्ष केंद्रित झाले आहे.