आयएमएलची नियंत्रण समिती जाहीर
वृत्तसंस्था / मुंबई
इंटरनॅशनल मास्टर्स लीग (आयएमएल)ची नियंत्रण समिती जाहीर करण्यात आली असून यामध्ये जागतिक क्रिकेट क्षेत्रातील तीन महान क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. भारताचे लिटल मास्टर सुनिल गावसकर हे मास्टर्स लीगचे आयुक्त म्हणून राहतील. तसेच विंडीजचे व्हिव्हीएन रिचर्डस् आणि द. आफ्रिकेच्या शॉन पोलॉक यांचा समावेश आहे.
क्रिकेट क्षेत्रातील या तीन महान खेळाडूंच्या सल्ल्याने आता आयएमएलची नियमावली आणि कार्यपद्धती राहिल. आयएमएलची पहिली स्पर्धा 17 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान नव्या मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविली जाणार आहे. या स्पर्धेतील सामन्यात लखनौ आणि रायपूर येथे होणार आहे. जागतिक क्रिकेट क्षेत्रामध्ये एकता राखण्यासाठी सुनिल गावसकर यांचे योगदान महत्वाचे आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडणारे ते पहिले भारतीय क्रिकेटपटू आहेत. विंडीजच्या सर रिचर्डस् यांनी 1970 आणि 1980 च्या दशकामध्ये स्फोटक फलंदाजी करत विंडीज संघाची दहशत निर्माण केली होती. द. आफ्रिकेचे माजी कर्णधार शॉन पोलॉक हे आफ्रिकन क्रिकेट क्षेत्रातील अव्वल अष्टपैलु म्हणून गाजले गेले.