For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशाच्या विकासात शिक्षकांचे योगदान

11:29 AM Sep 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
देशाच्या विकासात शिक्षकांचे योगदान
Advertisement

मंत्री हेब्बाळकर यांच्याकडून गौरवोद्गार : ग्रामीण गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्यावतीने शिक्षकदिन

Advertisement

बेळगाव : शिक्षक हे समाजाचे आदर्श असतात. राष्ट्राच्या भविष्यासाठी विद्यार्थ्यांना घडविण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांच्या हातून होत असते. आजवरच्या शिक्षकांनी दिलेली सेवा ही कौतुकास्पद आहे. आज देशाची प्रगती होत असताना अनेक डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ नवनवीन शोध लावत आहेत. यामध्ये शिक्षकांची सर्वात मोठी भूमिका असते, असे विचार राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.

बेळगाव तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. बेळगावमध्ये शिक्षकांना माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी एका भवनची आवश्यकता होती. मागील अनेक वर्षांपासून तशी मागणी शिक्षकांनी केली होती. अखेर ही मागणी काही दिवसांपूर्वी पूर्णत्वाला आली. गुरुभवन बांधण्यासाठी 17 गुंठे जागा मंजूर करण्यात आली असून त्या ठिकाणी भव्य गुरुभवन बांधण्याचा विचार असल्याचे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले.

Advertisement

गांधी भवन येथे झालेल्या कार्यक्रमाला मंत्री हेब्बाळकर यांच्यासमवेत रामकृष्ण मिशनचे मोक्षात्मानंद स्वामीजी, विधानपरिषद सदस्य डॉ. साबण्णा तळवार, जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, गटशिक्षणाधिकारी अंजनेय, डॉ. रामकृष्ण मराठे, बसवराज रायप्पगोळ, एम. एस. मेदार, जयकुमार हेबळ्ळी, बसवराज नलतवाड यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सत्कार सोहळे पार पडले.

आदर्श शिक्षक पुरस्काराअभावी नाराजी

शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्य, जिल्हा तसेच तालुका विभागवार आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. बेळगाव जिल्हास्तरीय तसेच बेळगाव शहर गटशिक्षणाधिकारी व खानापूर गट शिक्षणाधिकारी कार्यालयांच्यावतीने पुरस्कार देण्यात आले. परंतु यावर्षी बेळगाव ग्रामीण गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले नाहीत. यामुळे उपक्रमशील शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. आमच्या कामाची दखल घेण्यासाठी पुरस्कार देणे गरजेचे होते, अशी खंत काही शिक्षकांनी व्यक्त केली.

Advertisement
Tags :

.