Satara : पृथ्वीराज चव्हाणांच्या कारकिर्दीतच कंत्राटी भरतीचे 'जीआर': आ. जयकुमार गोरे
सातारा : प्रतिनिधी
आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात कंत्राटी भरतीचे जीआर निघाले. मात्र, त्यांनी ते रद्द केले नाही. आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी कंत्राटी भरतीबाबत मांडलेली भूमिका त्यांच्या विश्वासाला तडा जाणारी आहे. पहिल्या सरकारने केलेले पाप या सरकारच्या माथी मारून बदनाम करण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे, अशी टीका आ. जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
आ. गोरे म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात कंत्राटी भरतीचे जीआर निघाले. मात्र, त्यांनी ते रद्द केले नाही.
उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीसांनी हे जीआर रद्द करून आघाडीचा बुरखा फाडला. मराठा आरक्षणासह अनेक प्रश्नांवर सत्तेत असताना काही महाविकास आघाडी सरकारने काही भूमिका घेतली नाही. मात्र, सत्ता गेल्यानंतर टीका करून लोकांची दिशाभूल केली जात आहे..
२३ सप्टेंबरचा जीआर मागे घेण्याबाबत विचारले असता आ. गोरे म्हणाले, कंत्राटी भरतीचा जीआर निघाला का ? हाच प्रश्न आहे. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात कंत्राटी भरतीचे तीन-तीन जीआर निघाले. त्याबाबत ते का नाही बोलले? यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे. हिवाळी अधिवेशनाचा कमी होणाऱ्या कालावधीबाबत छेडले असता आ. गोरे म्हणाले, त्यांचे सरकार असताना हे अधिवेशनच रद्द केले होते. आमच्याबाबत बोलताना त्यांनी विदर्भात किती अधिवेशन घेतली? याचे आत्मपरिक्षण करावे.
आ. शिवेंद्रराजेंनी घेतलेल्या पाण्याच्या भूमिकेबाबत विचारले असता, आ. शिवेंद्रराजेंनी कर्तव्य म्हणून भूमिका मांडली आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी त्यांना मिळालेच पाहिजे. तत्कालीन सरकारने पाणी वाटपात भेदभाव केला हा माझा आरोप आहे. टेंभू प्रकल्पाचे पूर्ण २२ टीएमसी पाणी पूर्वीच्या नेत्यांनी सांगली व सोलापूरला दिले. आपल्या जिल्ह्याला आवश्यक तेवढे पाणी जाणत्या राजांनी आरक्षित केले नाही. त्यामुळेच ही परिस्थिती ओढावली. माण मतदारसंघात जरांगे-पाटील यांच्या झालेल्या सभेबाबत विचारले असता, मराठा आरक्षणाच्या माध्यमातून जरांगे- पाटील पुढे आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. परंतु, जरांगे-पाटील यांच्या सभेचा निवडणुकीवर फारसा काही परिणाम होणार नाही, असेही आ. गोर म्हणले.