बीइएमएल कंपनीला पहिल्या स्वदेशी बुलेट ट्रेनच्या बांधणीचे कंत्राट
867 कोटींचे कंत्राट : हायस्पीडचे काम 2026 पर्यंत होणार पूर्ण
मुंबई :
रेल्वे, संरक्षण, वाहतूक आणि खाणकामात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचे उत्पादन करणारी बीइएमएल ही कंपनी आहे. या कंपनीला आता देशातील पहिल्या स्वदेशी बुलेट ट्रेनचे कोच तयार करण्याचे कंत्राट मिळाले आहे. यासाठी कंपनीला 867 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) चेन्नईने कंपनीला हे कंत्राट दिले असल्याची माहिती आहे. जपानकडून बुलेट ट्रेन खरेदी करण्याचा करार न झाल्याने भारतीय रेल्वेने देशात बुलेट ट्रेनच्या बांधणीचा निर्णय घेण्यात आला आहे.
बीइएमएलने जारी केलेल्या फाइलिंगनुसार, प्रत्येक कोचची किंमत 27.86 कोटी रुपये असेल आणि एकूण करार मूल्य 866.87 कोटी रुपये आहे. यामध्ये डिझाईन खर्च, एक वेळचा विकास खर्च, नॉन-रिकरिंग चार्जेस, जिग्स, फिक्स्चर, टूलिंग आणि टेस्टिंग सुविधांसाठी एकवेळचा खर्च समाविष्ट आहे.
हायस्पीड बुलेट ट्रेनची डिलिव्हरी 2026 च्या अखेरीस
हा प्रकल्प भारताच्या हायस्पीड ट्रेन प्रवासातील मैलाचा दगड असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या प्रकल्पात 280 किमी प्रतितास वेगाने गाड्यांचे स्वदेशी डिझाइन आणि उत्पादन केले जाणार आहे. बीइएमएलच्या बेंगळूरू रेल्वे कोच कॉम्प्लेक्समध्ये बांधले जाणार आहेत व 2026 च्या अखेरीस वितरण करण्यात येणार असल्याचे अपेक्षित आहे.
फिरती खुर्ची आणि ऑनबोर्ड इन्फोटेन्मेंट सिस्टम
नवीन गाड्यांचे डबे पूर्णत: वातानुकूलित असतील. प्रतिबंधित गतिशीलता असलेल्या प्रवाशांसाठी स्वतंत्र सुविधा आणि ऑनबोर्ड इन्फोटेन्मेंट सिस्टम उपलब्ध असेल.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या महिन्यात (1 सप्टेंबर) वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या पहिल्या मॉडेलचे अनावरण केले. वंदे भारत स्लीपर ट्रेन येत्या 3 महिन्यांत म्हणजेच डिसेंबरपर्यंत सुरू होईल, असे त्यांनी सांगितले होते. कोचची निर्मिती पूर्ण झाली आहे. काही दिवसांत बीईएमएल कारखान्यातून बाहेर येईल. ट्रेनची चाचणी पुढील 2 महिने सुरू राहणार आहे. त्यानंतर ही ट्रेन प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे