इंडस्ट्री 4.0 चे संदर्भ आणि महत्त्व
गेल्या दशकातील जागतिक स्तरावरील वाढते औद्योगिकीकरण व व्यावसायिक स्पर्धा यामुळे उद्योग क्षेत्र सर्वार्थाने ढवळून निघाले आहे. पूर्वापार वा परंपरागत तंत्रज्ञान वा उद्योग-तंत्र पूर्णपणे बदलून गेले अथवा कालबाह्य ठरले आहे. यातूनच आवश्यकता निर्माण झाली ती नव संशोधन व तंत्रज्ञानासह औद्योगिक कार्यपद्धती स्वीकारून त्याची अंमलबजावणी करण्याची. याला जागतिक स्तरावर मूर्त रूप देण्याचे काम इंडस्ट्री 4.0 या व्यवस्थापन संकल्पनेने दिले आहे. ते अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण व अनुकरणीय ठरले असून याचाच घेतलेला हा मागोवा...
परंपरागरित्या औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या व महत्त्वपूर्ण अशा बदलांना औद्योगिक क्रांती असे संबोधले जाते. या मोठ्या व क्रांतिकारी बदलांमध्ये प्रगत व विकसित अशा तंत्रज्ञान व प्रक्रियेद्वारा व्यवसायाच्या उत्पादन वाढीवर विशेष भर दिला जातो. आजवरच्या औद्योगिक क्षेत्रातील क्रांतीमध्ये खालीलप्रमाणे महत्वपूर्ण टप्पे आढळून येतात.
पहिल्या औद्योगिक-तंत्रज्ञान विषयक क्रांतीमध्ये उद्योग पद्धती व प्रक्रियेमध्ये मानवी श्रम व प्रयत्नांच्या जागी पाणी व वाफेचा तांत्रिक पद्धतीने उपयोग करून उत्पादन प्रक्रियेला अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली. त्यानंतर औद्योगिक प्रगती-क्रांतीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्योग प्रक्रियेमध्ये विद्युत पुरवठ्याचा महत्त्वपूर्ण अंतर्भाव करण्यात आला. याच्याच पुढील व प्रगत टप्प्यात विशेष व महत्त्वाची बाब म्हणून उद्योग उत्पादन-प्रक्रियेमध्ये संगणकीकरण व स्वयंचलित प्रक्रियेवर आवर्जून भर दिला गेला. उद्योग आणि औद्योगिक प्रक्रियेत बदलत्या काळ आणि गरजांनुरूप आवश्यक अशा तंत्रज्ञान व कार्यपद्धतीचा अवलंब केल्याने त्यांचे विविध स्वरूपातील फायदे आज औद्योगिक क्षेत्राला सर्वदूर व आंतरराष्ट्रीय पातळीवर होताना दिसतात.
उद्योग आणि उद्योजकांना वरील तीन प्रमुख टप्प्यांमधील फायद्यांचा अनुभवांसह अभ्यास करून केवळ सध्याच्याच नव्हे तर भविष्यातील बदलत्या व वाढत्या गरजा लक्षात घेऊन त्यांची पूर्तता करण्यासाठी जी योजना आखण्यात आली त्याला इंडस्ट्री 4.0 असे नामाभिधान जागतिक स्तरावर देण्यात आले आहे हे या संदर्भात उल्लेखनीय आहे.
वरील पार्श्वभूमीसह उद्योग क्षेत्रात विकसित झालेल्या इंडस्ट्री 4.0 ची मुहूर्तमेढ जर्मनीमध्ये 2011 मध्ये झाल्याचा दाखला दिला जातो. या नव्या औद्योगिक उपक्रमामध्ये मुख्य भर संगणकीकृत माहिती तंत्रज्ञानाला विकसित करून त्याला बौद्धिक कार्यपद्धतीची व्यापक जोड देण्यात आली. यातून इंडस्ट्री 4.0 च्या माध्यमातून उद्योग-व्यवसाय क्षेत्रात अधिक कार्यक्षम, प्रभावी, लवचिक व त्याचवेळी व्यवसाय स्नेही कार्यपद्धतीचा स्वीकार करून वाढता प्रसार करण्यावर भर देण्यात आला. यातूनच इंडस्ट्री 4.0 चा मुख्य उद्देश उद्योग-व्यवसायाला बदलते व प्रगत तंत्रज्ञानाची व कार्यक्षमतेची साथ देऊन सार्वत्रिक व्यावसायिक प्रगतीवर भर देण्यावर निश्चित करण्यात आला.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे 2011 मध्ये इंडस्ट्री 4.0 ची सुरुवात जर्मनीमध्ये तेथील तत्कालीन सरकारद्वारा सुरू केलेल्या एका महत्त्वाकांक्षी पुढाकारातून झाली. यामागे मुख्य उद्देश होता तो तेथील उद्योगांना अधिकाधिक उत्पादक बनवणे. त्यासाठी जर्मनीतील उद्योग व तेथील काम करणारे या उभयतांमध्ये आपल्या स्व म्हणजे स्वत:वर आधारित कामाच्या संदर्भातील जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली.
या प्रयत्नांना त्याच्या पुढील टप्प्यात उद्योग-व्यवसायाच्या संदर्भात स्वत:चे आत्मपरीक्षण, तंत्रज्ञानासह विकसित शिक्षणाचा अवलंब व त्याच्याच जोडीला कृत्रिम बुद्धिमत्तेवर भर देण्यात आला. यातूनच जर्मनीतील उद्योगांनी अल्पावधीतच संगणकीय कार्यप्रणालीपासून प्रगत तंत्रज्ञान व यंत्रमानवाचा उपयोग यशस्वीपणे करण्यास सुरुवात केली.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारा नमूद केल्यानुसार इंडस्ट्री 4.0 मुळे उद्योगांना जागतिक स्तरावर एक नवी दिशा देऊन गतिमान करण्याचे महनीय काम केले आहे. यातूनच विविध क्षेत्रातील तंत्रज्ञानसुद्धा विकसित होत गेले. याच व्यावसायिक प्रगतीच्या माध्यमातून इंडस्ट्री 4.0 मुळे क्रांती निर्माण झाली. यामध्ये प्रगती उत्पादन प्रणाली व वाढत्या ग्राहकांद्वारा वाढीव विक्री व्यवहार हे टप्पे साध्य होत गेले. याचे काही आर्थिक परिणाम झाले व त्यामध्ये प्रामुख्याने उत्पादन व उत्पादकता वाढीमुळे होणारे आर्थिक लाभ, ग्राहकांच्या गरजांनुरुप उत्पादनाची आखणी, दर्जामध्ये सुधारणा, कर्मचाऱ्यांच्या क्षमतेतून उत्पादकता व या सर्वांच्या परिणामी वाढीव ग्राहक समाधान हे सारे फायदे साध्य होत गेले.
प्राप्त परिस्थितीत इंडस्ट्री 4.0 चा अवलंब करून त्यांची आपापल्या उद्योग-व्यवसायात यशस्वीपणे करण्यासाठी जागतिक स्तरावर काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वाढता अवलंब, उत्पादन पद्धतीला कृत्रिम बुद्धिमत्तेची साथ देणे व परिणामी उत्पादन क्षेत्रात मोठ्या बदलांसह औद्योगिक क्रांतीला चालना देणे इत्यादीचा समावेश केला जातो. अर्थात या अंमलबजावणीचा तपशील व त्याची पद्धत ही संबंधित देश, उद्योग व व्यवसाय स्थिती-पद्धतीनुसार वेगवेगळी असू शकते.
या संदर्भात संयुक्त राष्ट्र संघांतर्गत कार्यरत असणाऱ्या युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट या संस्थेतर्फे विविध देशांच्या इंडस्ट्री 4.0 च्या अंमलबजावणीच्या तयारीच्या संदर्भात आढावा घेऊन प्रकाशित केलेल्या आढावा अहवालात काही महत्त्वपूर्ण बाबी स्पष्ट झाल्या आहेत. या अहवालात नमूद केल्यानुसार जागतिक स्तरावर प्रगत व आर्थिकदृष्ट्या संपन्न अशा अमेरिका, स्वीडन, सिंगापूर, स्वित्झर्लंड व नेदरलँड यासारख्या देशांमध्ये इंडस्ट्री 4.0 च्या अंमलबजावणीने मोठी मजल मारली आहे. या उलट लॅटिन अमेरिका, कॅरिबियन, आफ्रिका यासारखे देश मात्र पिछाडीवर राहिले आहेत.
विकसनशील देशांच्या संदर्भात वरील अहवालात नमूद केल्यानुसार इंडस्ट्री 4.0 च्या अंमलबजावणीच्या संदर्भात पुरेशा तयारीसह चीनने अहवालात 35 वे स्थान घेतले आहे तर ब्राझील 40 व्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका 56 व्या स्थानावर असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. एक अन्य विशेष बाब म्हणजे चीनमध्ये नवसंशोधन मोठ्या प्रमाणात होत असले तरी या नावीन्यपूर्ण व नवकल्पनांची अंमलबजावणी करण्यासाठी संगणकीय सेवा यासारख्या मूलभूत सुविधांची वानवा असल्याने चीन या संदर्भात माघारलेला राहिला.
इंडस्ट्री 4.0 मध्ये भारताच्या झालेल्या प्रगतीमध्ये ज्या बाबींचे मुख्य योगदान आहे त्यामध्ये औद्योगिक क्षेत्राशी संबंधित संशोधन व विकास, माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळणाच्या अद्ययावत सुविधांसह कौशल्यप्राप्त व अनुभवी तंत्रज्ञ आणि कामगारांची उपलब्धता या कारणांचा उल्लेख करण्यात आला.
अर्थात या संदर्भात भारतापुढे काही आव्हानेपण आहेत. इंडस्ट्री 4.0 ची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यत: संगणकीय सेवा व संगणक सुरक्षा या बाबी प्रामुख्याने पुढे केल्या जातात. 5जी सारख्या दळणवळण वा संवाद तंत्रज्ञानाची उपलब्धता ही बाब भारतासाठी उत्साहवर्धक ठरली आहे. यालाच भारतातील उत्पादन तंत्रज्ञानाचा झालेला विकास व जागतिक स्तरावर घेतली जाणारी नोंद इंडस्ट्री 4.0 च्या संदर्भात उत्साहवर्धक ठरली आहे.
-दत्तात्रय आंबुलकर