काही मतदारसंघांतून निवडणूक लढविणे अनिवार्य : पालकमंत्री
बेळगाव : बीडीसीसी बँक निवडणुकीच्या निमित्ताने काही मतदारसंघांत हातमिळवणी झाली तर काही मतदारसंघांतून निवडणूक लढविणे अनिवार्य असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. शहरात मंगळवारी (दि. 14) माध्यमांशी ते बोलत होते. निवडणूक म्हटले की पराभवाची भीती प्रत्येक उमेदवारात असतेच व भीती असलीच पाहिजे. मतदारांत ज्या उमेदवाराबद्दल आदर व आपुलकी असते तोच उमेदवार निवडून येत असतो, हे सर्वसाधारणपणे निवडणुकीचे चित्र असते. बीडीसीसी बँक निवडणुकीत पराभूत झाल्यास पुढे मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यात अडचणी येतील या विचारातून आमदार अशोक पट्टण यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला का? या प्रश्नावर पालकमंत्री म्हणाले की, अशोक पट्टण हे निवड़णूक रिंगणात राहिले असते तर तेच निवड़ून आले असते. निपाणीमधून उत्तम पाटील यांना सहकार्य करू शकत नाही, हे मी यापूर्वीच सांगितले होते. या निवडणुकीत आम्ही अण्णासाहेब जोल्ले यांच्या बाजूने उभे आहोत. त्यांनाच निवडून आणू असा विश्वास मंत्री जारकीहोळी यांनी व्यक्त केला. कित्तूर मतदारसंघात हातमिळवणीचा प्रश्नच नाही. तेथील जागेसाठी निवडणूक होणार आहे. काही ठिकाणी बिनविरोध निवडीसाठी केलेले प्रयत्न सफल झाले. काही जागांसाठी निवडणूक होईल, असेही ते म्हणाले.