हलगानजीक कंटेनर उलटला
बेळगाव : चालकाचे नियंत्रण सुटून कंटेनर उलटला आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलगाजवळ गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही प्राणहानी झाली नाही. एनएल 01 एएच 0232 क्रमांकाचा कंटेनर धारवाडहून महाराष्ट्राकडे जात होता. हलगाजवळ वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटून महामार्गावर तो कलंडला. अपघातानंतर चालक व क्लिनर या दोघा जणांनी आपले वाहन महामार्गावरच सोडून तेथून पलायन केले आहे. घटनेची माहिती समजताच हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक सुंदरेश होळेण्णावर, पोलीस उपनिरीक्षक बसवराज मिटगार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. चालक व क्लिनर या दोघा जणांनी पलायन केल्यामुळे कंटेनरमध्ये नेमके काय आहे? याची माहिती मिळू शकली नाही. रात्री उशिरापर्यंत कंटेनर बाजूला काढण्याचे काम सुरू होते.