तिसरे रेल्वेगेट उड्डाणपूल येथे कंटेनरची पिलरला धडक
वर्षभरातील चौथी घटना : सुदैवाने धोका टळला
बेळगाव : तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलाच्या पिलरला कंटेनरची धडक बसल्याची घटना सोमवारी रात्री घडली. चालकाला उड्डाणपुलाच्या पिलरचा अंदाज न आल्याने ही धडक बसली. सुदैवाने मोठा अपघात घडला नसला तरी वर्षभरातील ही चौथी घटना घडली असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.काँग्रेस रोडमार्गे खानापूर रोड येथे जाण्यासाठी उड्डाणपुलाच्या खालून वाहने घेऊन जावी लागत आहेत. परंतु अवजड वाहतूक करणारे कंटेनर उड्डाण पुलाखाली अडकले जात आहेत. कंटेनरची उंची अधिक असल्यामुळे पिलर अथवा भिंतीला त्यांची धडक बसत आहे. रात्रीच्या वेळी चालकाला उंचीचा अंदाज न आल्यामुळे असेच अपघात वारंवार घडत आहेत.सोमवारी रात्री कंटेनरचा अपघात झाला. कंटेनरची दर्शनी बाजू पिलरला धडकली. त्यामुळे कंटेनर अडकला गेला. सकाळपर्यंत हा कंटेनर तेथेच होता. राष्ट्रीय महामार्गावरून खानापूर अथवा गोव्याला जाणाऱ्यांना याच मार्गाचा वापर करावा लागत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ आहे आणि यापूर्वीही वाहनांची धडक बसल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अवजड वाहनांच्या प्रवेशाबाबत पोलीस प्रशासनाने योग्य तो तोडगा काढणे गरजेचे आहे.